मंडणगड ( प्रतिनिधी ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A) च्या वतीने मंडणगड तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी बेमुदत उपोषणाच्या दणक्याने अखेर प्रशासन नरमले असून अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आंबेत- म्हाप्रळ खाडीपूल १५ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा तोंडावर सुरु करण्याचे प्रशासनाने उपोषण कर्त्यांना लेखी आश्वासन दिल्याने व अनेक मागण्या मान्य झाल्याने रिपाई च्या आंदोलनाला यश आले आहे.रिपाई ( ए ) चे माजी अध्यक्ष तसेच बौद्ध समाज सेवा संघाचे मंडणगड तालुका अध्यक्ष श्री. राजेश गमरे यांच्या नेतृत्वाखाली हे बेमुदत उपोषण मंडणगड तहसील कार्यालयासमोर करण्यात आले. विशेष म्हणजे मंडणगड तालुक्यातील जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न घेवून बेमुदत उपोषण करणाऱ्या रिपाई च्या या आंदोलनाला तालुक्यातील आजी व माजी सैनिकांनी दिलेला पाठींबा हा चर्चेचा विषय ठरला.
मंडणगड तालुका संध्या अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. सावित्री नदी वरील आंबेत- म्हाप्रळ खाडीपूल गेल्या तीन ते चार वर्षांपासून बंद असल्याने त्याचा परिणाम तालुक्यातील जनतेवर तर झालाच शिवाय चाकरमानी व सामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरु झाले.तालुक्यातील अनेक पक्षांनी व संघटनांनी अनेकवेळा यासाठी आंदोलने केली तर काहींनी जलसमाधीचा इशाराही प्रशासनाला दिला मात्र तात्पुरती मलमपट्टी करून प्रशासनाने वेळ मारून नेली. मात्र उदाशीन प्रशासन व राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे मंडणगड –दापोली तालुक्यातील जनतेचे मोठे हाल झाले आहेत.या पार्श्वभूमीवर रिपाई ए च्या वतीने आंबेत-म्हाप्रळ पूल तात्काळ सुरु न झाल्याने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला.व असंख्य कार्यकर्त्यांसह मंडणगड तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेश गमरे यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात बेमुदत उपोषणाला सुरुवात झाली. मात्र या आंदोलनाला वाढता पाठींबा लक्षात घेता अखेर संबंधित यंत्रणेने उपोषण कर्त्यांशी चर्चा करून त्यांना लेखी आश्वासन देवून आंबेत-म्हाप्रळ खाडीपूल गणेशोत्सवाच्या पूर्वी सुरु करण्याची हमी दिली आहे.त्यामुळे मंडणगड तालुक्यातील जनतेत तसेच मुंबईतील चाकरमानी व गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
तसेच मंडणगड तालुक्यामध्ये पेट्रोल व डिझेल च्या काळाबाजार रोखण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी उपोषण कर्त्यांना दिले.तर मंडणगड बसस्थानक परिसरातील शौचालयाचा मुद्दा संबंधितानी उपोषणाच्या दणक्याने पूर्ण केला आहे.तर मंडणगड तालुक्यातील शासकीय कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने त्याची गंभीर चौकशी करून त्यांच्यावर अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार श्री. तानाजी सेजाळ यांनी उपोषण कर्त्यांना दिले.तर खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन येत्या २ महिन्यात करण्याचेही मान्य झाल्याने तहसीलदार यांच्या विनंतीला मान देवून सायंकाळी ४ वाजता बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले.
या उपोषणाला तालुका अध्यक्ष राजेश साळवी,युवा नेते राजेश खैरे,दिनेश राऊत,तालुका संघटक सुनिल मोरे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र यादव,सागर खैरे,प्रतिक गमरे,विकी कदम,अनिकेत कदम,अनंत जाधव,गणेश जाधव,नितीन जाधव,शुभम पांचाळ ,राजाराम जाधव,निखील येलवे,माजी सैनिक शरद महाडिक, सुनिल जाधव, प्रकाश पवार,बळीराम चव्हाण,रमेश मोरे,सुहास दळवी,राजाराम बैकर,यांच्यासह शेकडो नागरिकांनी पाठींबा दिला











