ग्रामस्थांसह वनविभागाचा सक्रिय सहभाग
सावंतवाडी :वनपरिमंडळ मळगाव यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ अंतर्गत मळगाव मेट परिसरात स्वच्छता मोहीम अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. “स्वच्छता हीच सेवा, जंगल आमचा अभिमान!” या ब्रीदवाक्याला जागून राबवण्यात आलेल्या या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होत श्रमदान केले.
ही स्वच्छता मोहीम सावंतवाडीचे मा. उपवनसंरक्षक श्री. मिलिंद शर्मा व मा. सहायक वनसंरक्षक श्री. बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. वनक्षेत्रपाल श्री. सुहास पाटील यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आली होती. परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमात मळगावचे वनपाल श्री. विजय पांचाळ, वनपरिमंडळातील सर्व वनरक्षक, वनसेवक, आर.आर.टी. (RRT) टीमचे सदस्य आणि ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्वच्छता मोहिमेदरम्यान मळगाव मेट परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आणि जंगल व निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला. शासकीय अधिकारी, वनविभाग आणि नागरिक यांच्या एकत्र येण्यामुळे ही मोहीम खऱ्या अर्थाने यशस्वी ठरली असून उपस्थितांच्या या सक्रिय सहभागाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.












