मालवणमध्ये सिंधुदुर्गातील पहिली पोर्टा केबिन
२४ तास समुद्रकिनाऱ्यावर राहणार वॉच
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपास्थित उदघाटन
अमित खोत | मालवण : समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने शासनाच्या महत्वपूर्ण उपक्रमअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले ‘पोर्टा केबिन’ मालवण येथे उभारण्यात आले आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण बंदर जेटी येथील ‘पोर्टा केबिन’ चे उद्घाटन करण्यात आले.
राज्यातील विविध महत्वपूर्ण समुद्रकिनारी आणि लँडिंग पॉईंटवर अशा पोर्टा केबिनची उभारणी सुरू आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सागरी किनारी भागात मोठ्या प्रमाणात बोटींची ये-जा आणि पर्यटकांची गर्दी असलेल्या १४ लँडिंग पॉईंटची सुरक्षा लक्षात घेण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग यांच्या निधीतुन उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे हे पोर्टा केबिन असणार आहे. त्यापैकी मालवण, तारकर्ली आणि सर्जेकोट येथे पोर्टा केबिन उभारण्यात आले असून, किनारी सुरक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी ही केंद्रे कार्यरत राहणार आहेत.
यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, जिप वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नगरसेवक विकी तोरसकर, देवानंद लोकेगांवकर, किसन मांजरेकर, पंकज सादये, सुरेश बापार्देकर यांसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
२४ तास समुद्रकिनाऱ्यावर ‘वॉच’
मालवण किनारपट्टीवर दिवसरात्र गस्त व देखरेख ठेवण्यात येणार आहे. समुद्रातून येणाऱ्या-जाणाऱ्या बोटी, काही वेळा किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या अथवा आढळणाऱ्या संशयित वस्तू अथवा व्यक्ती आणि कोणतीही संशयास्पद घटना निदर्शनास आल्यास त्याची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात येणार आहे.
पोलिसांच्या मदतीला प्रशिक्षित मरीन होमगार्ड व मत्स्य विभागाचे वार्डन
किनारी सुरक्षेसाठी पोलिसांसोबत प्रशिक्षित मरीन होमगार्ड तसेच मत्स्य विभागाचे वार्डन पोलिसांच्या मदतीला असणार आहेत. समुद्र आणि किनारपट्टीवरील परिस्थितीची माहिती असलेल्या या यंत्रणेमुळे संशयास्पद हालचालींवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. स्थानिक मच्छिमार, व्यवसायिक, नागरिक यांचे मोठे सहकार्य नेहमीच असते आता याला अधिक बळ प्राप्त होणार आहे.
पोर्टा केबिन ठरणार महत्त्वाचा दुवा
मालवण हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा किनारपट्टीचा भाग असून येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची तसेच मच्छीमारी व पर्यटन व्यवसायातील बोटींची ये-जा असते. त्यामुळे किनाऱ्याची सुरक्षा, संशयित हालचालींवर नजर आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीची कार्यवाही यासाठी पोर्टा केबिन महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, पोलीस निरीक्षक राजेंद्र मकदुम आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली येथील किनारी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे.












