चिपळूण:
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांविरुद्ध चालवण्यात येत असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ या विशेष मोहिमेअंतर्गत चिपळूण पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत ३० हजार रुपये किमतीचा ५३० ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी अब्दुल गफ्फार हमीद म्हालदार (वय ४८, रा. चिवेली मोहल्ला, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (३१ जुलै) चिपळूण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक हद्दीत गस्त घालत असताना, वालोपे येथील रेल्वे स्टेशनसमोरील साई मंदिराशेजारी एक व्यक्ती हातात पिशवी घेऊन संशयास्पद हालचाली करताना आढळली. पथकाने तत्काळ पंचांसमक्ष त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव अब्दुल गफ्फार म्हालदार असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे असलेल्या कापडी पिशवीतील प्लास्टिकच्या पिशवीत ३० हजार रुपये किमतीचा ५३० ग्रॅम गांजासदृश अमली पदार्थ आढळून आला. हा अमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ च्या विविध कलमांनुसार गुन्हा (गु.र. क्र. २२३/२०२६) नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हवालदार संदीप माणके, वृषाल शेटकर, रोशन पवार तसेच पोलीस शिपाई शैलेश वनगे व रुपेश जोगी यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.













