भाजपा तालुका अध्यक्ष मोहन घुमे यांची महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळेंकडे मागणी
राजापूर प्रतिनिधी :राजापूर तालुक्यातील धोपेश्वर, बारसू, पन्हळे तर्फे राजापूर या परिसरातील देवस्थान इनाम जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फारमर आयडी मिळत नसल्याने पीक विमा, पीएम-किसान, नमो शेतकरी, कृषी कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. .या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा या शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन घुमे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रविवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या ना. बावनकुळे यांना घुमे यांनी हे निवेदन दिले आहे. याची तात्काळ दखल घेत ना. बावनकुळे यांनी अपर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे व योग्य ती कारवाई करावी असे ओदश दिले आहेत.
राजापुर तालुक्यातील धोपेश्वर, बारसू, पन्हळे तर्फे राजापूर या परिसरातील अनेक शेतकरी देवस्थान इनाम जमिनीवर अनेक वर्षांपासून शेती करत आहेत. मात्र, ७/१२ उताऱ्यावर “देवस्थान इनाम” अशी नोंद असल्यामुळे कृषी विभाग आणि तलाठी कार्यालयाकडून फार्मर आयडी साठी नोंदणी केली जात नाही. परिणामी शेतकरी शासनाच्या महत्त्वाच्या कृषी योजनांपासून वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान इनाम जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून फार्मर आयडी देण्याबाबत शासनाने आवश्यक आदेश जारी करावेत, अशी मागणी मोहन घुमे यांनी निवेदनातून केली आहे.
महसूल मंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत अपर जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना केल्याची नोंदही निवेदनावर करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा संबंधित शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.










