चिपळूणमधील सामाजिक एकता परिषदेत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे परखड प्रतिपादन
चिपळूण (वार्ताहर) : शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात पार पडलेल्या सामाजिक एकता परिषदेत ज्येष्ठ पत्रकार व लेखक संजय आवटे यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय भारत अपूर्ण असल्याचे नमूद करत आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. २६ सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेत त्यांनी जातीय ध्रुवीकरणावर ताशेरे ओढत, सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी तरुणाईच्या सजग सहभागाचे कौतुक केले. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात निर्भय बनो भारत जोडो अभियांनांतर्गत 26 सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राजन इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सामाजिक एकता परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
चिपळूणमधील सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक एकोपा कायम राखण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहरूंमुळेच देश समृद्ध आवटे पुढे म्हणाले, पंडित नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान नसते तर भारताचा विकास एवढ्या व्यापक पातळीवर झाला नसता. भारत हा विविधतेत एकता जपणारा संघराज्यात्मक देश आहे. मात्र सध्या समाजात जातीय ध्रुवीकरणाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी समाजाने सजग राहणे आवश्यक आहे. देशातील संत, समाजसुधारक आणि पुरोगामी विचारवंतांनी भारताला एकत्र बांधून ठेवण्याचे कार्य केले असून चिपळूणसारख्या शहरात विविध संघटना एकत्र येऊन सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी कौतुकाने नमूद केले. तरूणाईचे कौतूक तरुणाईचा उल्लेख करताना आवटे म्हणाले की, ‘आजची तरुणाई वैचारिकदृष्ट्या जागृत असून तिच्या सामाजिक सहभागाचे कौतुक केले पाहिजे. पूर्वीच्या चळवळी चटणी-भाकरीवर होत होत्या, तर आजची पिझ्झा-बर्गर खाणारी तरुणाईही समाजपरिवर्तनासाठी रस्त्यावर उतरते, बदल घडवून आणते ही सकारात्मक बाब आहे. जंतरमंतरवरील आंदोलनात मुला-मुलींनी एकत्रितपणे सहभाग घेत असतानाही सुरक्षिततेची भावना टिकून राहते, हे नव्या पिढीचे मोठे यश आहे. पालकांनी मुलांना जाती-धर्माच्या चौकटीत न अडकवता चांगले संस्कार देऊन प्रथम माणूस म्हणून घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. देशातील सामाजिक सलोखा, लोकशाही मूल्ये आणि संविधानिक विचार टिकवून ठेवण्यासाठी अशा सामाजिक एकता परिषदांची आवश्यकता असल्याचे आवटे यांनी यावेळी सांगितले.
या सामाजिक एकता परिषदेचे आयोजन संविधान सन्मान समिती, छत्रपती संभाजी ब्रिगेड, समता सैनिक दल, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचारमंच, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्र सेवा दल, पूज्य गांधी प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा, चिपळूण मुस्लिम समाज संघटना, बौद्धजन पंचायत समिती, सत्यशोधक शिव प्रवर्तक समिती, अंजुमन दर्द मंदाने, बौद्धजन उत्कर्ष समिती, कोकण सिरत कमिटी, ओबीसी संघर्ष समिती, दिव्यांग सेवा संस्था, मुस्लिम समाज विकास संघ, चिपळूण तालुका बौद्धजन हित संरक्षण समिती, कोकण कन्या फाउंडेशन, यशसिद्धी माजी सैनिक संघ, जमियत उलेमा चिपळूण, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आम्ही चिपळूणकर या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सुत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले.













