सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी राजेंद्र मगदूम

अमोल चव्हाण यांच्याकडे डीवायएसपी पदाचा अतिरिक्त कार्यभार

​सावंतवाडी: सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या राजेंद्र मगदूम यांनी आज अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर सावंतवाडीतील विविध संघटना तसेच विविध क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांनी श्री. मगदूम यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सावंतवाडीत मनापासून स्वागत केले.
​दरम्यान, सावंतवाडी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी बदली झालेले अमोल चव्हाण यांच्याकडे दोन दिवसांसाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक (डीवायएसपी) पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधीक्षक राजेश भागवत हे दोन दिवस रजेवर असल्यामुळे हा पदभार चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
​दिवसभरात परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि अमोल चव्हाण या दोघांनाही त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या.
​या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, माधुरी मुळीक, प्रमोद पाटील, अमित राऊळ, मनोज राऊत यांच्यासह सावंतवाडी पोलीस ठाण्यातील इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.