सिंधुदुर्गच्या जिल्हा माहिती अधिकारीपदी सचिन अडसूळ!

अनुभवी अधिकाऱ्याकडे जिल्ह्याच्या जनसंपर्काची धुरा.

सिंधुनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माहिती अधिकारी म्हणून सचिन अडसूळ यांनी सोमवारी या पदाचा कार्यभार स्वीकारला! यापूर्वी त्यांनी गडचिरोली व कोल्हापूर या जिल्ह्यात माहिती अधिकारी म्हणून काम केले आहे. सोमवारी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचे अनेक मान्यवरांनी स्वागत केले!

मुकुंद चिलवंत यांची अहिल्यानगर येथे बदली झाली होती. व त्यांच्या जागी श्री अडसूळ यांची नियुक्ती झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सचिन अडसूळ यांनी सोमवारी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी कार्यालयातील सतीश कोरे, स्वप्नाली कुंभार, अमित राणे आणि शंकर आडेलकर उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, प्रभावी नियोजनशैली आणि प्रसारमाध्यमांशी सुसंवादासाठी ओळख असलेले सचिन अडसूळ यांनी यापूर्वी जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर तसेच गडचिरोली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा व्यापक प्रचार-प्रसार, सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर आणि नागरिकांपर्यंत शासकीय उपक्रमांची माहिती पोहोचविण्यात त्यांनी विशेष योगदान दिले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन २०१९ च्या बॅचमधून वर्ग-१ अधिकारी म्हणून निवड झालेल्या अडसूळ यांनी माहिती व जनसंपर्क विभागात रुजू होण्यापूर्वी जिल्हा परिषद, पुणे येथे सुमारे १२ वर्षे विविध पदांवर कार्यरत राहून समृद्ध प्रशासकीय अनुभव मिळविला आहे.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेल्या सचिन अडसूळ यांचा मूळ जिल्हा सातारा आहे. प्रशासकीय अनुभव, माध्यमांचा सखोल अभ्यास आणि जनसंपर्क क्षेत्रातील प्रभावी समन्वयाच्या बळावर त्यांनी शासनाच्या अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना सचिन अडसूळ म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्राधान्याने काम करणार आहे. प्रसारमाध्यमांशी अधिक सक्षम समन्वय साधत माहिती व जनसंपर्क विभागाचे कार्य अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”