अपील अधिकाऱ्यांचा पत्ता तुम्हीच शोधा.

साखरपा प्रा.आरोग्य केंद्रातील माहिती अधिकाऱ्याचे उत्तर

साखरपा वार्ताहर:

माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीचे उत्तर समाधानकारक न देता, मिळालेल्या उत्तराच्या विरुद्ध अपील करण्यासाठी अपील अधिकारी व त्यांचा पत्ता मला माहित नाही तो तुम्ही शोधा असे बेजबाबदार उत्तर देऊन स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रकार साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. ही भाषा कोणत्या गावगुंडाची नाही, की टपोरी व्यक्तीची नाही. ही भाषा आहे साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदार व्यक्ती आरोग्य सहाय्यक व माहीती अधिकारी दत्तात्रय मारुती भस्मे यांचे. वरिष्ठाच्या बाबतीत उत्तर देणे आरोग्य खात्याच्या जबाबदार कर्मचाऱ्याला शोभत नसून आरोग्य खाते काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.दिनांक १५ मे २०२६ रोजी माहितीच्या अधिकारात आवश्यक माहिती मागवली त्यातील अपूर्ण माहिती दिली. त्याबबद्दल पुन्हा त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार पुन्हा माहितीच्या अधिकारात दिनांक २४ जून २०२६ ला माहिती मागितली, त्याचे उत्तर देण्यास अपयशी ठरले. त्यामुळे याबाबतीत मी अपील अधिकारी यांचे नाव व पत्ता द्या असे म्हटले मात्र तो न देता मला अपील अधिकारी व त्यांचा पत्ता माहित नाही तो तुम्ही शोधा असे बेजबादार उत्तर दिले. जर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव व पत्ता माहित नसेल तर माहिती अधिकारी दत्तात्रय भस्मे यांना त्या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. जर पत्रकाराला असे बेजबाबदार व अशोभनीय उत्तर मिळत असेल तर सर्व सामान्यांना काय वागणूक मिळत असेल असा संतप्त प्रश्न संतोष पोटफोडे यांनी उपस्थित केला आहे. भस्मे हे आपल्या कार्य क्षेत्रात राहत नसून ते देवरुख येथे राहतात व त्यांच्यासाठी असणाऱ्या साखरपा आरोग्य केंद्रातील रूमचा वापर उपकेंद्रातील कर्मचारी करत आहे. त्यामुळे कामावर येण्याचे वेळेचे बंधन नाहीच, मात्र गेलीं अनेक वर्षे साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात चिकटून राहिलेल्या भस्मे यांची बदली का होत नाही. अनेकांच्या बदल्या प्रत्येक खात्यात तीन- चार वर्षानी होतात. मात्र गेलीं अनेक वर्षे दत्तात्रय मारुती भस्मे यांची बदली का होत नाही. असा कोणता जी.आर.आहे की अनेक वर्षे झाली तरी बदली होत नाही. त्यांच्यासाठी वेगळा नियम व दुसऱ्यांसाठी वेगळा नियम असा भेदभाव झाला तर जानेच्या मनात प्रशासनाविषयी वेगळा संभ्रम निर्माण होईल. त्यांना पाठीशी घातले जातेय की की वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.अशी संतप्त पोलखोल संतोष पोटफोडे यांनी केली असून. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून आयुक्ताकडे याबाबत लेखी तक्रार करणार असल्याचे पोटफोडे यांनी सांगितले.