शहरातील इतर अड्ड्यांवर कारवाई कधी?
आचरा मार्गावरील कारवाईनंतर मटका व्यवसायिकांमध्ये खळबळ
शहरभर सुरू असलेल्या मटक्यावर प्रश्नचिन्ह
कणकवली : कणकवली शहरातील आचरा मार्गावरील एका बेकरीच्या शेजारी असलेल्या पान स्टॉलमध्ये सुरू असलेल्या कथित मटका बुकीवर कणकवली पोलिसांनी आज दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या दरम्यान धाड टाकून कारवाई केली. या कारवाईमुळे मटका खेळणारे व चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, मटका व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत पीएसआय प्रितेश पाटील व पोलिस कर्मचारी सचिन माने यांनी सहभाग घेतला होता. पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकत कारवाई केल्याने परिसरात काही काळ चर्चा रंगली होती.
दरम्यान, या कारवाईचे स्वागत होत असले तरी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर मटका व्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. एका पान स्टॉलवर कारवाई झाली, मात्र इतर ठिकाणी सुरू असलेल्या कथित मटका अड्ड्यांवर पोलिस कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कणकवली शहरात अवैध मटका व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सातत्याने आणि सर्वंकष कारवाई करावी, अशी मागणीही यानिमित्ताने नागरिकांकडून व्यक्त होत आहे.












