राजापुरात ग्रामविकास अधिकारी संघटनेच्या वतीन पंचायत समिती आवारात आ. किरण सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण

राजापूर प्रतिनिधी: पर्यावरण संवर्धन आणि हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी राजापूर ग्रामविकास अधिकारी संघटनेच्या वतीन राजापुर तालुका पंचायत समिती आवारात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
राजापूर तालुका ग्रामविकास अधिकारी संघटनेच्या वतीने बुधवारी पंचायत समिती आवारात या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. सामंत यांसह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विविध प्रकारचे वृक्ष पंचायत समिती आवारात लावण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आमदार किरण सामंत यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत”वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून ती प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. झाडे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करून ती जगविणे अधिक महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पुढील पिढीला स्वच्छ, निरोगी वातावरण देण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवडीचा संकल्प केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि तापमानवाढ यांसारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड आणि त्यांचे संवर्धन हाच प्रभावी मार्ग आहे. शासनाच्या विविध उपक्रमांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक व्यापक होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजापूर ग्रामविकास अधिकारी संघटनेने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे आ. सामंत यांनी कौतुक केले.
याप्रसंगी सभापती नंदीनी कदम, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, गटविकास अधिकारी रोहित कुंभार, ग्रामविकास अधिकारी संघटना अध्यक्ष संतोष चव्हाण यांसह सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अधिकारी, सर्व ग्रामविकास अधिकारी यांसह पंचायत समितीचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे ग्रामविकास अधिकारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.