देवरुख/रत्नागिरी:
चालत्या दुचाकीवर अचानक मोबाईलचा स्फोट झाल्याने भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना देवरुख ते पांगरी रस्त्यावर घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या हातखंबा येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुमित विलास कांबळे (वय ३९) आणि विकास काशिराम कांबळे (वय ३९, दोघे रा. हातखंबा, ता. जि. रत्नागिरी) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विलास चंद्रकांत कांबळे हे आपल्या जुपिटर दुचाकीवरून (क्र. MH-47 V-7492) सुमित कांबळे आणि विकास काशिराम कांबळे यांना मागे बसवून देवरुख ते पांगरी रस्त्याने हातखंबा येथे येत होते. दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास मौजे पांगरी बौद्धवाडीकडे जाणाऱ्या फाट्यापासून ७० मीटर अंतरावर, तीव्र उतारावर असलेल्या वळणावर ही गाडी आली असता, दुचाकीवर असलेल्या विकास चंद्रकांत कांबळे यांच्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला.
मोबाईलच्या स्फोटामुळे दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या साईडला असलेल्या दगडी मोरीवर घसरत गेली. या अपघातात गाडीवरून खाली पडल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर तिघांनाही तातडीने खाजगी ॲम्बुलन्सने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले.
मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुमित विलास कांबळे आणि विकास काशिराम कांबळे या दोघांनाही तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. चालत्या गाडीवर मोबाईलचा स्फोट होऊन झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे हातखंबा परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.












