न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे पार पडली विपश्यना कार्यशाळा

विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता,मानसिक शांतता, सकारात्मक विचारसरणी विकसित व्हावी यासाठी आयोजन

लांजा (प्रतिनिधी ):विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, आत्मभान, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित व्हावी, या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे विपश्यना कार्यशाळा नुकतीच पार पडली.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विपश्यना व आनापान ध्यानपद्धतीची ओळख करून देण्यात आली. मनावर नियंत्रण ठेवणे, वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करणे, भावनांचे निरीक्षण करणे आणि अभ्यासामध्ये एकाग्रता वाढविणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ध्यानाच्या माध्यमातून मन शांत व स्थिर ठेवण्याचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ध्यानाचा अनुभव घेतला. काही काळ शांतपणे बसून श्वासाचे निरीक्षण करण्याच्या आनापान साधनेमुळे मनाची चंचलता कमी करून एकाग्रता कशी वाढविता येते, याचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला.आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ‘शांत मन, स्थिर विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन’ या दिशेने विद्यार्थ्यांना वाटचाल करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.

कार्यशाळेला प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यशाळेचा लाभ घेतला. विपश्यना कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ ध्यानपद्धतीची माहिती मिळाली नाही, तर स्वतःच्या मनाचे निरीक्षण करण्याची आणि शांततेतून स्वतःला घडविण्याची एक महत्त्वपूर्ण दिशा मिळाली, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.