निवृत्त प्राध्यापक शिवाजी सावंत यांचे निधन
रत्नागिरी: येथील पॉलिटेक्निकल कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक शिवाजी केरू सावंत (वय ८५) यांचे शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आपल्या खडतर व यशस्वी शैक्षणिक कारकिर्दीत पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सेवा बजावत असताना शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले. एक अत्यंत साधे, कष्टाळू, निस्सीम ज्ञानप्रेमी आणि शिस्तप्रिय प्राध्यापक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये परिचित होते. शिक्षणदानाचे व्रत आयुष्यभर प्रामाणिकपणे जोपासत त्यांनी अनेक पिढ्या घडवण्याचे मोलाचे कार्य केले. निवृत्तीनंतरही ते सामाजिक व पारिवारिक बांधिलकी जपत सतत मार्गदर्शक भूमिकेत सक्रिय होते.
त्यांच्या पश्चात मोठा हसताखेळता परिवार असून, यामध्ये त्यांची पत्नी सुरेखा सावंत, मुलगा गोपीनाथ सावंत, रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेविका असलेल्या कन्या श्रद्धा हळदणकर, जावई संजय हळदणकर तसेच मुली लालन कांबळे आणि संध्या कांबळे असा परिवार आहे.
सावंत कुटुंबीयांवर आलेल्या या दुःखाच्या प्रसंगी रत्नागिरीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील नेते, त्यांचे माजी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सांत्वन करण्यासाठी उपस्थित होते.












