भूपकरवाडीत संशयास्पद व्यक्ती आढळल्याने खळबळ

नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित पोलिसांच्या ताब्यात

कुडाळ :
पिंगुळी येथील भूपकरवाडी परिसरात एक अनोळखी व संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. सतर्क नागरिकांनी तत्काळ पिंगुळी गोंधळचे पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच शंकर सातार्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीची चौकशी केली. मात्र, त्याच्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने त्यांनी तत्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पिंगुळीचे पोलीस पाटील सतीश माडये तसेच व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक गावडे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून संबंधित संशयास्पद व्यक्तीस पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेमुळे परिसरात काही काळ सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या परिसरात अधिक दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाडी-वस्तीमध्ये अनोळखी अथवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कोणतीही कारवाई न करता तत्काळ पोलीस पाटील किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे या घटनेची वेळीच दखल घेऊन संबंधित व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.