देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंडीजवळ रस्ता वाहतुकीसाठी धोक्याचा बनला असून प्रवाशांच्या सुरक्षेस्तव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाट मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या एसटी बसेस पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांनी एसटी विभागाला दिला आहे.
सतत पडणारा पाऊस त्यातर रस्त्याला पडलेल्या मोठ्या भेगा त्यामुळे अरुंद झालेला रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. आंबा घाटाऐवजी लांजा – वाटुळ – ओणी – पाचल – अनुस्कुरा – मलकापूर – कोल्हापूर या मार्गे एसटी बसेस नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला अधिक खर्च होणार असून प्रवासाचे अंतर ४२ कि.मी. ने वाढणार आहे. त्यामुळे प्रवासी भाड्यात ०७ टप्प्याने वाढ होणार आहे. याबाबतच्या आदेशाची प्रत स्थानक प्रमुख – रत्नागिरी, चिपळूण, देवरुख, लांजा, राजापूर, मलकापूर, कोल्हापूर व वाहतूक नियंत्रक – पाली, लांजा, पाचल, मलकापूर, कोल्हापूर यांना देण्यात आली आहे.













