पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे फणस शेतीला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्याची मागणी
लांजा (प्रतिनिधी) : लांजा येथील प्रगतशील युवा शेतकरी आणि फणस किंग अशी ओळख असलेले मिथिलेश देसाई यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन फणस शेती आणि कृषी परिसंस्थेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. लांजा गाव ते थेट नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हा मिथिलेश देसाई यांचा प्रवास थक्क करणारा असून लांजा तालुका वासियांसाठी ही बाब निश्चितच अभिमानास्पद ठरली आहे.
मिथिलेश देसाई हे गेले अनेक वर्षांपासून आपल्या झापडे येथील जागेमध्ये फणसाच्या विविध प्रजातींची लागवड करून फणस किंग म्हणून नावारूपास आलेले आहेत. त्यांच्या या बागेला विविध क्षेत्रातील आजवर शेकडो मान्यवर व्यक्तींनी भेट देऊन त्यांच्या कमाचे कौतुक केले आहे. या पार्श्वभूमीवर मिथिलेश देसाई यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट विशेष चर्चेत आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत मिथिलेश देसाई यांनी आपल्या वडिलांपासून सुरू असलेल्या फणस शेतीविषयक कामाची सविस्तर माहिती सादर केली. सध्या भारतामध्ये पंच्याऐंशी टक्के भागात फणस उपलब्ध असून योग्य प्रक्रिया न झाल्यामुळे तो मोठ्या प्रमाणावर वाया जातो. या फणसाची एकूण जागतिक व देशांतर्गत अर्थव्यवस्था ही दोन अब्ज डॉलर्सची असून, आगामी वर्षाला भारताचे फणस वर्ष म्हणून घोषित करण्यात यावे, अशी आग्रही विनंती त्यांनी पंतस्रधानांना केली.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने कामाची दखल घेत शेती क्षेत्रासाठी अमूल्य मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे फणस शेती आणि त्यावरील संपूर्ण कृषी परिसंस्थेमध्ये सुरू असलेल्या कार्याची माहिती देत या भेटीचा योग जुळवून आणला. यासाठी मिथिलेश देसाई यांनी पवार कुटुंबियांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या भेटीदरम्यान फणसापासून तयार करण्यात आलेल्या विविध नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन व सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त फणसाचे पीठ, प्रथिनांनी समृद्ध असणाऱ्या बियांचे पीठ, पिकलेल्या फणसाचे चिप्स यांसह फणसाच्या सालीपासून तयार करण्यात आलेल्या डफलग बँग आणि पासपोर्ट होल्डर यांसारख्या पर्यावरणपूरक व उच्च दर्जाच्या वस्तूंचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सर्व उपक्रम व उत्पादने अत्यंत आस्थेने समजून घेतली असून सर्व संबंधित कागदपत्रे व उत्पादने स्वीकारत या कामाची सविस्तर माहिती मागितली आहे. लांजा तालुक्यातील एका गावातून सुरू झालेला हा प्रवास आता थेट देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्यामुळे संपूर्ण कोकणात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.













