
मुंबई विद्यापीठ कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे आवाहन
श्री पंचम खेमराज महाविद्यालयात NEP २०२० वर जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात
सावंतवाडी । प्रतिनिधी :विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. हे धोरण पूर्णपणे विद्यार्थी-केंद्री असून, याची अंमलबजावणी सकारात्मक व प्रभावीपणे होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी यांनी येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज (एस. पी. के.) महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
आपल्या मार्गदर्शनात कुलगुरू प्रा. कुलकर्णी पुढे म्हणाले की, सिंधुदुर्ग हा पर्यटन आणि समृद्ध जैवविविधता लाभलेला जिल्हा आहे. त्यामुळे येथील स्थानिक गरजांनुसार आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारे अभ्यासक्रम शिक्षणात समाविष्ट करणे गरजेचे आहे. जागतिक स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सक्षमपणे उभे करणे हाच या नवीन शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोंसले होते. त्यांनी आपल्या भाषणात कुलगुरूंचे आभार मानताना जिल्ह्यातील स्थानिक गरजा, उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची आखणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. पी. के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले. स्वायत्त व बिगर-स्वायत्त महाविद्यालयांमधील एन.ई.पी. अंमलबजावणी, प्राध्यापकांचा कार्यभार आणि सहा व्हर्टिकल्स या विषयांवर मार्गदर्शन करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या जिल्हास्तरीय कार्यशाळेस मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागांचे प्रमुख तसेच जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये कॉमर्स डीन डॉ. बांबर्डेकर, डॉ. सुचित्रा नाईक (ठाणे), डॉ. अनिता आवटी (खेड), डेटा ॲनालिसिस तज्ज्ञ डॉ. प्रवीण सिनकर आणि संस्था संचालक प्रा. डी. टी. देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, NEP समन्वयक, IQAC समन्वयक व परीक्षा समिती प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांमध्ये कुडाळ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, नाथ पै महाविद्यालयाचे प्रा. अरुण मर्गज, वैभववाडीचे डॉ. चव्हाण, देवगडचे डॉ. कुनुरे, गोगटे वाळके महाविद्यालयाचे डॉ. गोविंद काजरेकर, खर्डेकर महाविद्यालयाचे डॉ. धनराज गोस्वामी, शिरगावचे प्रा. समीर तारी, मालवणचे डॉ. कैलास राबते, दोडामार्गचे डॉ. यू. एल. देठे, हळबे महाविद्यालयाचे डॉ. सुभाष सावंत, कट्टा महाविद्यालयाचे प्रा. डी. व्ही. मिराशी आणि अण्णा राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रा. सचिन पाटकर आदींचा समावेश होता.
कार्यक्रमप्रसंगी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. एम. बुवा यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. एस. ए. देशमुख यांनी मानले.












