वेंगुर्ला न.प.चे नमो उद्यान नागरिकांसाठी खुले :लवकरच लोकार्पण :नगराध्यक्ष दिलीप गिरप

उद्यानाची अधिकाऱ्यांकडून पाहणी व तपासणी

वेंगुर्ले : दाजी नाईक
शासनाच्या निर्देशानुसार वेंगुर्ला नगरपरिषदेकडून उभारण्यात आलेल्या नमो उद्यानाची पाहणी व तपासणी करण्यासाठी आज तपासणी समिती वेंगुर्ला येथे दाखल झाली. समितीने वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नमो उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी करून उद्यानातील विविध कामे, उपलब्ध सुविधा तसेच कामाची सद्यस्थिती यांची सविस्तर माहिती घेतली. दरम्यान वेंगुर्ला न.प.चे हे नवीन नमो उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले असून लवकरच याचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे अशी माहिती, नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.

शासनाकडून नमो उद्यान ही संकल्पना राबविण्यात आली असून, त्यासाठी प्रत्येक नगरपरिषदेस १ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर निधीतून नमो उद्यानाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने वेंगुर्ला नगरपरिषदेने उभारलेल्या नमो उद्यानाची तपासणी समितीमार्फत करण्यात आली.

या तपासणी समितीमध्ये सिंधुदुर्ग जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश खेबुडकर, कोकण विभाग नगरपरिषद प्रशासन विभागीय सह आयुक्त विजयकुमार म्हसाळ, कोकण विभाग नगरपरिषद प्रशासन उपआयुक्त सागर ढोलप, कोकण विभाग नगरपरिषद प्रशासन कार्यकारी अभियंता रुपाली पाटील, कोकण विभाग नगरपरिषद प्रशासन स्थापत्य अभियंता शशिकांत पवार यांचा समावेश होता. समितीने नमो उद्यानाची पूर्णपणे पाहणी करून उद्यानातील कामांचा दर्जा, नियोजन, उपलब्ध सोयी-सुविधा तसेच नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक बाबींची माहिती घेतली. उद्यान अधिक सुशोभित, आकर्षक व नागरिकांसाठी उपयुक्त करण्याबाबत यावेळी आवश्यक सूचना करण्यात आल्या.

या पाहणी समितीचे नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप यांनी स्वागत केले . यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. हेमंत किरुळकर, नगरसेवक श्री. प्रशांत आपटे व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नमो उद्यानाचा नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळावा, उद्यानाचा परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक राहावा तसेच नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे. वेंगुर्ला शहराच्या सौंदर्यात भर घालणारे तसेच नागरिकांना विरंगुळा, आरोग्य व मनोरंजनासाठी उपयुक्त असे नमो उद्यान विकसित करण्यात आले आहे.