काहीच केले नाही म्हणून जनतेने घरी बसवले याचे आत्मपरीक्षण करा
नगराध्यक्षा ममता वराडकर, दीपक पाटकर व पूनम चव्हाण यांचा विरोधकांवर हल्लाबोल
भुयारी गटार, नळपाणी, नाट्यगृह, भाजी मार्केट, कचरा व्यवस्थापनसह रखडलेल्या कामांचा पाढाच वाचला
आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली मालवणच्या गतिमान विकासासाठी आम्ही कटीबद्ध
मालवण | प्रतिनिधी : नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. दहा वर्षे अपयशी ठरलेल्या माजी आमदार वैभव नाईकांच्या कारभाराची ‘पोलखोल’ केली. भुयारी गटार, नळपाणी, नाट्यगृह, भाजी मार्केट, सफाई कर्मचारी निवासस्थान, कचरा व्यवस्थापनसह रखडलेल्या कामांचा पाढाच यावेळी वाचला. आता टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्या आई त्यावेळी नगरसेविका होती. याचा अर्थ आपल्या आईच्या व माजी आमदार वैभव नाईक यांच्या अपयशाची पोलखोल तपस्वी मयेकर स्वतःच करत आहेत. वैभव नाईकांनी काहीच केले नाही म्हणून जनतेने घरी बसवले. असाही टोला यावेळी पुनम चव्हाण यांनी लगावाला.
दरम्यान, मालवण शहराच्या गतिमान विकासासाठी आणि नागरिकांच्या सेवेसाठी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आम्ही कटीबद्ध आहोत. अनेक कोटी निधी विकास प्रकल्प साठी आमदार निलेश राणे यांनी उपलब्ध करून दिला. मागील दहा वर्षात जेवढा निधी आला नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने निधी आमदार निलेश राणे यांनी आणला. असेही नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मालवण नगरपरिषद नगराध्यक्ष दालन येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, महिला बालकल्याण उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, निना मुंबरकर, मेघा सावंत, महेश कोयंडे आदी यावेळी उपस्थित होते.
मालवण नगरपरिषद ठाकरे गटाच्या नगरसेवकांकडून सोशल मीडियावर एआय व्हिडीओ वापर करून नगरपरिषदेवर सुरू असलेल्या टीकेला नगराध्यक्षा ममता वराडकर, दीपक पाटकर आणि पूनम चव्हाण यांनी आक्रमक प्रत्युत्तर देत माजी आमदार वैभव नाईक यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाचा व टीका करणाऱ्या ठाकरे गटाचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्या आई त्यावेळी नगरसेविका होत्या त्यांच्याही अपयशी कारभाराचा खरपूस समाचार घेतला. “दहा वर्षे सत्ता आणि संधी मिळूनही मालवणच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. ज्या समस्या वर्षानुवर्षे तुमच्या कार्यकाळात रखडल्या, त्याच समस्या आज आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मालवण शहरातील भुयारी गटार योजना, नळपाणी, नाट्यगृहाची दुरवस्था, सफाई कर्मचाऱ्यांची रखडलेली निवासस्थाने, भाजी मार्केटचा प्रश्न, स्पोर्ट्स कॉमलेक्स आणि कचरा व्यवस्थापन या मुद्द्यांवरून त्यांनी ठाकरे गटाला थेट लक्ष्य केले. “दहा वर्षे सत्ता असताना या प्रश्नांवर ठोस तोडगा का निघाला नाही? विकासकामे का रखडली? याचे उत्तर आधी द्यावे आणि नंतर नगरपरिषदेवर आरोप करावेत,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चार वर्षे प्रशासक होते तेव्हा वैभव नाईक आमदार होते. त्यावेळी काय केले. त्यांचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी सातत्याने अनेक विषय मांडले मात्र ते सुटले नाहीत. सोडवता आले नाहीत. अखेर महेश कांदळगावकर आमच्या शिवसेना पक्षात आले. असेही पुनम चव्हाण यांनी सांगितले.
मालवण शहराला त्याकाळी माझी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांनी नळ पाणी योजना आणली. अनेक वर्षानंतर ती योजना जिर्ण झाल्यानंतर पुन्हा नवी योजनाही राणेसाहेबांनीच मंजूर केली. मात्र आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकाळात ही योजना आणि सर्वच कामे पूर्णपणे रखडली. आता आमदार निलेश राणे यांच्या काळात सर्व कामे योजना पुढे नेण्याचे काम सुरू आहे. विरोधकांना जे जमले नाही ते आमचे आमदार निलेश राणे वर्षभराच्या कार्यकाळात करत आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वात जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत उपलब्ध आहोत असे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सांगितले.
“दहा वर्षे सत्तेत असताना काय केले?”
“मालवण शहरातील अनेक मूलभूत प्रश्न आजही कायम आहेत. हे प्रश्न एका दिवसात निर्माण झालेले नाहीत. वर्षानुवर्षे त्याकडे दुर्लक्ष झाले. दहा वर्षांचा कार्यकाळ मिळूनही जर प्रश्न सुटले नसतील, तर त्या अपयशाची जबाबदारी त्यावेळी असलेल्या तुमच्या आमदार व नगरसेविका असलेल्या तुमच्या आईची”. आता जनतेची दिशाभूल करण्यासाठी सोशल मीडियावर टीका करून व उपोषण नाटक करत आहेत. असे सांगत वराडकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
म्हणून जनतेने घरी बसवले
“जनतेने कामाचा हिशोब घेतला आणि म्हणूनच वैभव नाईक यांना घरी बसवले. आता जनतेने निलेश राणे यांच्यावर विश्वास ठेवला आहे. गेल्या दहा वर्षात जेवढा निधी आला नाही त्यापेक्षा कितीतरी पट जास्त निधी आमदार निलेश राणे यांनी आणला. त्यांचा विश्वास विकासकामांच्या माध्यमातून सार्थ ठरविण्याची जबाबदारी आमची आहे,” असे वराडकर, पाटकर, चव्हाण यांनी स्पष्ट केले.
“आधी आत्मपरीक्षण करा”
नगरपरिषद विरोधात उपोषण करणाऱ्या ठाकरे गटाचे तपस्वी मयेकर यांच्यावर ममता वराडकर, दिपक पाटकर, पुनम चव्हाण यांनी सडकून टीका केली. “आज नगरपरिषद प्रशासनाला प्रश्न विचारणाऱ्यांनी आपल्या राजकीय आणि प्रशासकीय इतिहासाकडेही पाहावे. त्यांच्या आई त्याच काळात नगरसेविका होत्या.तुमचे आमदार होते. त्या काळात शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी काय प्रयत्न झाले, याचेही आत्मपरीक्षण करावे,” असा टोला त्यांनी लगावला. मात्र प्रत्येक प्रश्नावर काम सुरू असून प्रलंबित कामांना गती देण्याचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली गतिमान विकास ; अनेक कोटी विकास निधी
*“जनतेने आमदार निलेश राणे यांना मोठ्या विश्वासाने विजयी केले आहे. या विश्वासाला पात्र राहून मालवण शहराच्या विकासासाठी आमदार निलेश राणे सातत्याने मोठा निधी उपलब्ध करत आहेत. आताच 22 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर झाला. यापूर्वी हि कोट्यावढी निधी मंजूर झाला. अनेक विकास प्रकल्प आहेत. शहरासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध होत असून रखडलेली कामे पूर्ण करण्यासोबतच नव्या विकासकामांनाही गती दिली जात आहे,” असे ममता वराडकर, दीपक पाटकर व पूनम चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना चांगल्या सुविधा मिळणे, मूलभूत प्रश्न सुटणे आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होणे, हे आमचे ध्येय आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी अॅप तयार केले आहे. समस्यांवर तत्काळ कार्यवाही होईल. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.










