आराध्य व लेईशा पराडकर भावंडांची चमकदार कामगिरी
मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांकासह जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान
मालवण | प्रतिनिधी : शिष्यवृत्ती परीक्षेत एकाच कुटुंबातील भाऊ-बहिणीने प्रत्येकी २४२ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोळंब कातवड शाळेचे मुख्याध्यापक नारायण केशव पराडकर व मालवण पंचायत समिती ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक वर्षा नारायण पराडकर यांचा मुलगा आराध्य आणि मुलगी लेईशा यांनी ही उज्ज्वल व चमकदार कामगिरी केली आहे.
इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आराध्य पराडकर याने २४२ गुण मिळवत शहरी सर्वसाधारण गटाच्या जिल्हा गुणवत्ता यादीत १९ वा, तर मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत लेईशा पराडकर हिनेही २४२ गुण मिळवत शहरी सर्वसाधारण गटाच्या जिल्हा गुणवत्ता यादीत १३ वा, तर मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला.
एकाच कुटुंबातील दोन्ही भावंडांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तापूर्ण यश मिळविल्याने पराडकर कुटुंबाच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
केंद्रप्रमुख गुरुनाथ ताम्हणकर यांनी शाळेत जाऊन दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच गटविकास अधिकारी परागिणी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती श्याम झाड, सदस्य दीपक चव्हाण, माजी गटविकास अधिकारी प्रफुल वालावलकर, गडचिरोली गटविकास अधिकारी आत्मज मोरे, माजी सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी व कोळंब केंद्रप्रमुख प्रशांत पारकर यांच्यासह नातेवाईक, शिक्षक व मित्रपरिवाराने आराध्य व लेईशाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












