स्वातंत्र्य सैनिकांच्या विचारांचा जागर करून ते आत्मसात करूया- मनोहर खापणे

राजापूर (वार्ताहर): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे व आपल्या परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा जागर करूया व व ते आत्मसात करूया असे आवाहन खापणे महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष मनोहर खापणे यांनी येथे केले.
ते श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित हर घर तिरंगा उपक्रमाच्या समारोप सत्रात बोलत होते. ते म्हणाले भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी महत्त्वाचे योगदान दिले. पाचल , करक परीसरासह माडबन भाग स्वातंत्र सैनिकांचा म्हणुन ओळखला जात होता. आजही तो ओळखला जातो. सरकार दप्तरी राजापूर तालुक्यातील 32 पेक्षा अधिक स्वातंत्र्यसैनिकांची नोंद आढळते. अण्णा वायकूळ,अण्णा लब्धे, आबा मलुष्टे, आबा नारकर, गोविंद मांजरेकर, सखाराम पवार, केशव नारकर, सहदेव ठाकरे,शोभना वायकूळ, शांताबाई तेंडुलकर, जानकीबाई शेटे, जानकीबाई तेंडुलकर अशा कितीतरी स्त्री आणि पुरुष स्वातंत्र्य सैनिकांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊन शिक्षा भोगली.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस नरेश पाचलकर, संस्थेचे सदस्य श्री.बाबा सावंत, सदस्य चंद्रकांत लिंगायत महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.पी. एस.मेश्राम,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, गटचर्चा, तिरंगा शपथ, महाविद्यालय परिसर व पिकअपसेड परिसर स्वच्छता, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आल्याचे डॉ. विकास पाटील यांनी सांगितले. यावेळी रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन श्री. खापणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.