विविध विकासकामांसाठी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांची भेट
मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांची देखील भेट घेऊन केली चर्चा; पाणी योजना, नवीन मच्छी मार्केट आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी या कामांचा केला पाठपुरावा
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी देवरुख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांनी आपल्या सहकारी नगरसेवकांसह मुंबई येथे विविध महत्त्वपूर्ण भेटी घेतल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांची भेट घेऊन देवरुख शहरातील विविध विकासकामांसंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. शहराच्या मूलभूत सुविधा आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली. देवरुख शहराची महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना, नवीन मच्छी मार्केट इमारतीचे काम तसेच देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी, अशा महत्त्वपूर्ण विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये व शिष्टमंडळाने मंत्रालयातील संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
या भेटींच्या माध्यमातून देवरुख शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा आणि शहराच्या पायाभूत विकासाशी संबंधित प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यात आले. या सर्व कामांना गती मिळावी आणि विकासकामांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या मुंबई दौऱ्यात नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांच्यासमवेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत शेट्ये, भाजपा जिल्हा क्रीडा सेल अध्यक्ष दत्ताराम नार्वेकर, भाजपा तालुका सरचिटणीस संदीप वेलणकर, भाजपा देवरुख शहराध्यक्ष सुशांत मुळे, शहर उपाध्यक्ष संजय इंदुलकर, नगरसेविका कविता नार्वेकर, नगरसेविका समृद्धी वेलणकर,
नगरसेविका श्रद्धा इंदुलकर आणि स्वीकृत नगरसेवक रुपेश भागवत उपस्थित होते. देवरुख शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक कामाचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा मुंबई दौरा महत्त्वपूर्ण ठरला.













