अपूर्व निसर्गभक्ती आणि परंपरेचा अलौकिक संगम
सावंतवाडी । प्रतिनिधी : श्रावण महिन्याचे आगमन म्हणजे निसर्गाच्या कुशीत चैतन्याचा नवा अंकुर फुलण्याचा काळ. याच श्रावणातील पहिला आणि अत्यंत पवित्र सण म्हणजे नागपंचमी. प्राणीमात्रांविषयी कृतज्ञता, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा जपणारा हा सण अवघ्या महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. साधारणपणे गणपती बाप्पाचे आगमन दीड, पाच, सात, नऊ किंवा अकरा दिवसांसाठी होते हे आपण सर्वजण जाणतो; परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवसाची नागपंचमी साजरी करण्याची एक अत्यंत अनोखी, दुर्मिळ आणि आध्यात्मिक परंपरा गेली दोनशेहून अधिक वर्षे अखंडितपणे जपली जात आहे. विशेष म्हणजे या दीड दिवसांच्या उत्सवात साकारला जाणारा नागराज चक्क पाच फणांचा (पंचमुखी) असतो, जे या परंपरेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
शेतकऱ्यांचा सखा आणि भूमीचा रक्षक मानल्या जाणाऱ्या नागाची विधिवत पूजा करून हा उत्सव साजरा केला जातो. या परंपरेचा प्रारंभ नागपंचमीच्या पूर्वसंध्येलाच होतो. पूर्वसंध्येला कुलदेवतेचे पूजन, नागराजाचे विधिवत पूजन, ब्राह्मण भोजन आणि एकादशीचा धार्मिक विधी पार पडतो. नागपंचमीच्या दिवशी सकाळी वारुळाच्या देखण्या देखाव्यात पाच फण्यांची आकर्षक मातीची नागप्रतिमा आणून तिची स्थापना केली जाते. यानंतर दूध, लाह्या आणि करंज्यांचा नैवेद्य नागराजाला अर्पण केला जातो. या घराण्यातील महिला एकत्र येऊन पारंपरिक ओवसा घालतात. तसेच भजनाच्या आणि फुगड्यांच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन जाते. केवळ मळगावच नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक या अद्भूत आणि पवित्र रूपाचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून उपस्थिती लावतात.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास आरती आणि भजनाचा विलोभनीय कार्यक्रम रंगतो. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच्या गजरात अळवाच्या पानावर या पाच फण्याच्या नागराजाचे अत्यंत भावुक वातावरणात विसर्जन केले जाते. विसर्जनानंतर सर्व भाविकांना शेगलाची भाजी आणि भाकरी असा अत्यंत सात्विक आणि पारंपरिक प्रसाद दिला जातो.
वडिलोपार्जित चालत आलेली ही दोन शतकांची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेव कै. शांताराम बंडू गोसावी आणि कै. रामचंद्र बंडू गोसावी यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी अत्यंत निष्ठेने पुढे नेणीत आहे. आज धर्मनाथ शांताराम गोसावी, संजय शांताराम गोसावी, सतीश रामचंद्र गोसावी, चंद्रकांत बाबी गोसावी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब ही आगळीवेगळी परंपरा तेवढ्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपत आहेत. आधुनिकतेच्या प्रवाहात जुन्या संस्कृतीचा लोप होत असताना मळगावच्या गोसावी घराण्याने जपलेली ही दीड दिवसाच्या पंचमुखी नागोबाची परंपरा निसर्ग आणि ईश्वराच्या तादात्म्याचे एक अलौकिक प्रतीक ठरली आहे.












