शेतकऱ्यांना वितरीत केलेल्या अल्प मुदत शेतीपुरक खावटी कर्जाचा समावेश प्रस्तावित कर्जमाफी मध्ये करावा

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

वेंगुर्ले : दाजी नाईक
सिंधुदुर्ग बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरीत केलेल्या अल्प मुदत शेतीपुरक खावटी कर्जाचा समावेश प्रस्तावित कर्जमाफी मध्ये करण्यात यावा अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे आज मंगळवारी बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी यांनी राज्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.

श्री. मनीष दळवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेशी संलग्न २२६ प्राथमिक विकास संस्था आहेत. शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७” च्या कर्जमाफी योजनेत या संस्थांच्या कर्जमाफीस पात्र लाभार्थी शेतक-यांच्या संस्थानिहाय तयार केलेल्या यादयांमधून शेतीपूरक खावटी कर्जाच्या थकीत व प्रोत्साहनपर सभासदांना वगळण्यात आले होते.

​सदरचे कर्ज नाबार्डच्या धोरणानुसार बँकेने आपल्या बँक कर्ज विषयक धोरणात तरतूद करुन शेतकऱ्यांना अल्प मुदत पिक कर्जाबरोबरच स्वतंत्रपणे वैयक्तिक रु.२०,०००/- मर्यादेपर्यंतचे अल्प मुदत शेतीपूरक खावटी कर्ज (Consumption Loan) म्हणून वितरीत केले आहे. या कर्जाचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये समावेश करणेसाठी बँकेने तत्कालीन मा.मुख्यमंत्री महोदय, मा.सहकार मंत्री महोदय यांचेकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यातील शेती संस्थांच्या शेतीपूरक खावटी सभासदांना महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,शासन निर्णय क्र. क्रुकप १०१८/ प्र.क्र. १५५/२-स दि.१३ फेब्रुवारी २०१९ च्या आदेशान्वये खावटी कर्जाचा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये समावेश करणेत आला. या आदेशानुसार बँकेने आपल्या ९६९४ सभासदांच्या रु.१३३७.०० लाख रक्कमेची माहिती शासकीय लेखा परीक्षकांकडून तपासणी करुन घेवून महाऑनलाईनकडे ईमेलद्वारे सादर केली होती.

​शासन आदेशानंतर लेखा परीक्षकांकडून तपासणी पूर्ण झाल्यावर सदरील डेटा पोर्टलवर अपलोड करणेसाठी पोर्टलवर अपलोड सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. वरीलप्रमाणे खावटी कर्जाचा समावेश छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये करणेचा आदेश होऊ नही याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही शासन पातळीवरुन झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जाची रक्कम प्राप्त झाली नसल्यामुळे या कर्जमाफी योजनेपासून शेतकरी अद्यापही वंचित राहिले आहेत.

​सन २०१७ व २०१९ मधील कर्जमाफीस पात्र शेतकरी कर्जमाफी पासून अद्यापही वंचित राहिल्यामुळे त्यांना कर्जमाफी देणेबाबत मंगळवार ०९/०६/२०२६ रोजीच्या मंत्री मंडळ बैठकीमध्ये यावर चर्चा झाली असून सदर वंचित कर्जदार शेतक-यांना कर्जमाफी देणेबाबत मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सदर निर्णयामध्ये आमच्या बँक संलग्न शेती संस्थांमार्फत खावटी कर्जवाटप केलेल्या थकीत शेतकऱ्यांच्या कर्जाचा विचार होऊन सदर कालावधीतील पात्र शेतक-यांना कर्जमाफी मिळणेस विनंती आहे. असे या निवेदनात म्हटले आहे.