मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे इन्सुलीत भीषण अपघात : कार पलटी 

कार दुभाजकावर धडकून महिला २० फूट उडाली; चौघे जखमी

​बांदा:

मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कोठावळेबांध येथे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे गुरुवारी एक अत्यंत भीषण अपघात घडला. दीव-दमण येथून गोव्याच्या दिशेने जाणारी भरधाव क्रेटा कार महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे अनियंत्रित झाली आणि थेट दुभाजकावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली व अपघाताच्या तीव्रतेमुळे कारचा दरवाजा उघडून आत बसलेली एक महिला तब्बल २० फूट उंच उडून रस्त्यावर फेकली गेली. या दुर्घटनेत ही महिला गंभीर जखमी झाली असून कारमधील इतर तीन प्रवासीही जखमी झाले आहेत.

​प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील कोठावळेबांध परिसरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून प्रशासनाने येथील खड्ड्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याच खड्ड्यांमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. अपघाताचा मोठा आवाज होताच स्थानिक ग्रामस्थ ज्ञानेश्वर मोरजकर, लक्ष्मण पाटील, देवेन कासकर, प्रशांत वारंग, आपा आमडोसकर, ओमकार मोरजकर, उमेश मोरजकर, मंजू नायर, नलू मोरजकर, अभिजित कोठावळे आणि तुषार तोरसकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने बचावकार्य सुरू करत जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले.

​या अपघातात जखमी झालेल्यांपैकी फ्रासिस परेरा यांच्यावर बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. तर रसेल डिसोझा, एन्सलम डिसोझा आणि रानीता (सर्व रा. गोवा) या उर्वरित तीन जखमींना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील रानीता यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) हलविण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गावरील या प्राणघातक खड्ड्यांमुळे दररोज अपघातांची मालिका सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात असून हे खड्डे तत्काळ बुजवावेत, अशी मागणी केली जात आहे..