दुर्गम कशेळीकोंड शाळेची स्वरा बावकर शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

वार्ताहर पाली :
रत्नागिरी तालुक्यातील खानू केंद्रांतर्गत जि.प. प्राथमिक शाळा कशेळी कोंड या रत्नागिरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील शाळेची विद्यार्थिनी स्वरा अजित बावकर हिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या शासनाच्या अधिकृत गुणवत्ता यादीत ३००पैकी २२२ गुण मिळवून जिल्ह्यात १०० वे व तालुक्यात १७ वे स्थान मिळवून तिने शाळेच्या व गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
इयत्ता चौथीच्या स्तरावर अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत ‘स्वरा’ हिने सुरुवातीपासूनच अभ्यासात चिकाटी आणि सातत्य ठेवले होते तिच्या या यशामध्ये तिचे कठोर परिश्रम,शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कठीण परिस्थितीतही आई अंकिता बावकर व वडील अजित बावकर यांचा खंबीर पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरला.तिच्या या ऐतिहासिक यशामध्ये केंद्रप्रमुख विष्णु पवार, गोविंद तारवे, माजी मुख्याध्यापक राजाराम खाकम,मुख्याध्यापिका व मार्गदर्शिका माधुरी शिंदे पाटील आणि सहाय्यक शिक्षक अमोल काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सायली ताम्हणकर,माजी सरपंच दिपक बावकर, पो.पा. प्रकाश बावकर, शिक्षणतज्ज्ञ अनंत ताम्हणकर,अनिल ताम्हणकर,अशोक ताम्हणकर व मान्यवर उपस्थित होते.