आंबवलीतील तरूणाच्या अपघाती मृत्यूप्रकरणी ट्रकमालकावरही गुन्हा दाखल करून सहआरोपी करा

देवरूख पोलीस ठाण्यात नातेवाईकांसह ग्रामस्थांची धडक; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
जोपर्यंत ट्रकमालकावर गुन्हा दाखल करून सह आरोपी करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही; नातेवाईकांची मागणी

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथील प्रतीक सावंत या ३२ वर्षीय तरूणाच्या अपघाती मृत्यप्रकरणी अवैधरित्या चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकमालवरही गुन्हा दाखल करून त्याला सहआरोपी करा, या मागणीसाठी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी देवरूख पोलीस ठाण्यात आज गुरूवारी धडक दिली. व जोपर्यंत ट्रकमालकावर गुन्हा दाखल करून सह आरोपी करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तापले होते. कोसुंब-ताम्हाणे मार्गावर चिऱ्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकची जोरदार धडक बसून प्रतीक सावंत या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

कोसुंब-ताम्हाणे मार्गावरील सिमेचीवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात प्रतिक सावंत या ३२ वर्षीय तरुणाचा नाहक बळी गेल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. केवळ अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकावरच नव्हे, तर बेकायदेशीर चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकावरही तात्काळ गुन्हा दाखल करा, या प्रमुख मागणीसाठी आक्रमक ग्रामस्थांनी देवरूख पोलीस ठाण्यात थेट ‘ठिय्या आंदोलन’ सुरू केले आहे. जोपर्यंत ट्रक मालकावर कठोर कारवाई केली जात नाही आणि या मार्गावरील अनधिकृत चिरे वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातली जात नाही, तोपर्यंत प्रतिक सावंत यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा ठाम आणि आक्रमक निर्णय नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला आहे. नातेवाईक व ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे देवरूख पोलीस ठाण्याच्या परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांची समजूत काढण्याचे आणि कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मागण्यांवर ठाम असणारे ग्रामस्थ तसूभरही मागे हटण्यास तयार नसल्याने आता प्रशासन काय पाऊल उचलणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांसोबत माजी जि प अध्यक्ष रोहन बने, भाजपचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. बेदरकारपणे होणारी चिऱ्यांची वाहतूक मृत्यूस कारणीभूत ठरत आहे, त्यामुळे केवळ चालकावर कारवाई करून भागणार नाही; मालकालाही तितकेच जबाबदार धरून गुन्हे दाखल झाले पाहिजेत, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.