अखेर लांजा शहरातील उड्डाण पुलावरून प्रायोगिक तत्त्वावर गुरुवारी सायंकाळी एकेरी वाहतूक सुरू

लवकरच उड्डाणपूल होणार वाहतुकीसाठी खुला, लांजा वासियांची होणार त्रासातून मुक्तता

लांजा (प्रतिनिधी ) मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील उड्डाणपुलावरून मुंबई ते गोवा या दिशेने जाणारी एकेरी वाहतूक गुरुवारी सायंकाळी ६ वाजता प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली. पुढील पाच दिवसात हा उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती महामार्गाचे अधिकारी श्री. कुलकर्णी यांनी दिली.
लांजा शहरातून जाणारा मुंबई गोवा महामार्ग आणि येथील उड्डाण पुलाचे काम गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या स्थितीत होते. त्यामुळे त्याचा त्रास हा लांजावासीयांना भोगावा लागत होता. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम कधी होणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला होता. गणेशोत्सव तोंडावर आले असल्याने आणि उड्डाणपुराचे काम वेगाने सुरू असल्याने तो लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

या पार्श्वभूमीवर अखेर पुलाचे प्रमुख काम पूर्ण झाले असून सुरक्षेची पाहणी करून गुरुवारी सायंकाळपासून एका बाजूची वाहतूक मोकळी करण्यात आली आहे. उर्वरित किरकोळ कामे आणि डांबरीकरणाचा अंतिम हात पुढील ३ ते ४ दिवसांत पूर्ण करून संपूर्ण पूल वाहतुकीस खुला केला जाईल.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनधारक त्रस्त झाले होते. उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ही वर्षानुवर्षांची कोंडी कायमची फुटणार आहे. विशेषतः गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून कोकणात येणाऱ्या लाखों चाकरमान्यांचा प्रवास यामुळे अत्यंत वेगात आणि खड्डेमुक्त, सुखकर होणार आहे. ऐन सणाच्या काळात लांजात होणारा खोळंबा आता टळणार असल्याने प्रवाशांमधून आणि स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.