रत्नागिरी :
मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित रत्नागिरी जिल्ह्याचे वार्षिक नियोजन सत्र ‘भारत शिक्षण मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे उत्साहात पार पडले.
हे नियोजन सत्र मुंबई विद्यापीठाचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) प्रा. सुशील शिंदे, एनएसएस विभाग प्रमुख प्रा. रमेश देवकर आणि जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरी जिल्हा NSS विभागीय समन्वयक प्रा. युवराज पाटील, तसेच प्रा. विकास पाटील, भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह धनेश रायकर आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे यांनी प्रास्ताविक करताना नियोजन सत्राचा मुख्य उद्देश उपस्थितांना सांगितला. प्रमुख अतिथी प्रा. सुशील शिंदे यांनी सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांना नियोजन सत्राची आवश्यकता व महत्त्व पटवून देत शुभेच्छा दिल्या, तर प्रा. रमेश देवकर यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. या औपचारिक उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. स्मार्था कीर यांनी केले. व आभार राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख सहा प्रा. मिथिला वाडेकर यांनी मानले.
उद्घाटनानंतर पार पडलेल्या मुख्य सत्रात प्रा. रमेश देवकर यांनी एनएसएसच्या वार्षिक कामकाजाची सूत्रे आणि वर्षभरात राबवायचे विशेष उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. सुशील शिंदे यांनी एनएसएसचे महत्त्वाचे अहवाल सबमिशन आणि अकाउंट्स (हिशोब) संदर्भातील तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
या नियोजन सत्रास रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे सत्र अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाले.













