ओणम सणानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या

मुंबई,  : ओणम सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते तिरुवनंतपुरम नॉर्थ दरम्यान विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

 

गाडी क्रमांक 01463 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नॉर्थ विशेष गाडी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी रात्री 11.30 वाजता तिरुवनंतपुरम नॉर्थ येथे पोहोचेल.

 

तर गाडी क्रमांक 01464 तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी 29 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता तिरुवनंतपुरम नॉर्थ येथून सुटून तिसऱ्या दिवशी पहाटे 12.55 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

 

या विशेष गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमळी, मडगाव, कारवार, कुमटा, मुरुडेश्वर, उडुपी, मंगळुरू, कासरगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरनूर, त्रिशूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चंगनाश्शेरी, तिरुवल्ला, कोल्लम आणि वर्कला शिवगिरी आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

 

या गाड्यांमध्ये एकूण 24 डबे असणार असून त्यामध्ये एसी टू टियरचे 3, एसी थ्री टियरचे 4, स्लीपरचे 11, जनरलचे 4 तसेच एसएलआरचे 2 डबे असतील.

 

प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.