Breaking : खेडमध्ये गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआरची भीषण धडक; तिघे जखमी, महिला गंभीर

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-रत्नागिरी मार्गावरील भरणे नाका परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात वॅगनआरमधून प्रवास करणाऱ्या एका पुरुषासह दोन महिला जखमी झाल्या असून, त्यापैकी एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. गंभीर जखमी महिलेला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या अपघातामुळे भरणे नाका परिसरात काही काळ खळबळ उडाली.
भरणे नाका येथील वारकरी मठासमोर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एमएच ०५ एफव्ही ९३८३ क्रमांकाची वॅगनआर कार गोव्याच्या दिशेने जात असताना एमएच ०६ सीपी २०३९ क्रमांकाच्या गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडकली. धडक एवढी भीषण होती की वॅगनआर कारची दिशा बदलून ती मुंबईच्या दिशेने वळली. तर धडकेनंतर टेम्पो काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला.
सदर टेम्पो पेन येथून गणेशमूर्ती घेऊन साखरपा परिसराच्या दिशेने जात होता. टेम्पोमध्ये गणेशोत्सवासाठी नेण्यात येणाऱ्या अनेक गणेशमूर्ती होत्या. अपघातामुळे या गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच हा अपघात घडल्याने मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्नही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
वॅगनआर कारमधून रोहन बाळकृष्ण बाळसराफ, सोनल चव्हाण आणि कोमल शिर्के हे प्रवास करत होते. हे तिघेही बदलापूर येथून गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी निघाले होते. भरणे नाका परिसरात त्यांच्या कारची गणेशमूर्ती वाहून नेणाऱ्या टेम्पोला धडक झाल्याने तिघेही जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील एका महिलेची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघातग्रस्त वाहनांची माहिती घेतली तसेच पुढील तपास सुरू केला आहे. अपघातामुळे काही काळ मार्गावर वाहतुकीवर परिणाम झाला होता.
दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वॅगनआरचा वेग अधिक होता का, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले का किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ही धडक झाली, याचा तपास खेड पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.