पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार ३ सप्टेंबरला देवगडमध्ये जनता दरबार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांचे अधिकारी राहणार उपस्थित; नागरिकांच्या समस्यांचे होणार निराकरण

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी देवगड पंचायत समितीतर्फे गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम इंद्रप्रस्थ हॉल, सातपायरी, जामसंडे, ता. देवगड येथे होणार आहे.

 

गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तत्काळ कार्यवाही व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबारात एस.टी. महामंडळ, महावितरण (MSEDCL), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग या प्रमुख विभागांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच अन्य संबंधित विभागांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे आणि उपसभापती अमोल लोके यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडता येणार असून, त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

नागरिकांनी आपल्या विविध समस्या व तक्रारी घेऊन या जनता दरबारास उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड पंचायत समितीतर्फे करण्यात आले आहे.