खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च, चार महिन्यातच खड्डे पूर्ववत

लांजा साटवली मार्गावरील प्रकार, गणेशोत्सवापूर्वी खड्डे न भरल्यास आंदोलनाचा इशारा

लांजा (प्रतिनिधी) : लांजा साठवली या सागरी मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ३५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र अवघ्या चार महिन्यातच पुन्हा खड्डे पडले.‌ निकृष्ट दुरुस्तीमुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असून गणेशोत्सवापूर्वी खड्डे न भरल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कोंडये ग्रामपंचायतीचे सरपंच मनोज चंदुरकर यांनी दिला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजा, यांना दिलेल्या निवेदनात कोंडये सरपंच मनोज चंदुरकर यांनी म्हटले आहे की, लांजा शहराकडून कोंडये हद्दीतून साटवलीच्या दिशेने जाणाऱ्या या सागरी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शासनाने तब्बल ३५,२१,३९१/- एवढा निधी खर्च केला होता. परंतु, अवघ्या २ ते ४ महिन्यांतच बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. ऐन दोन-चार महिन्यांत पुन्हा डागडुजी करण्याची वेळ आल्याने सार्वजनिक निधीचा हा योग्य वापर आहे का? आणि या निकृष्ट कामाची जबाबदारी नेमकी कोणाची? असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे.
राज्य महामार्ग क्र. १६८ (सागरी महामार्ग) वर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली दुरुस्ती निकृष्ट दर्जाची झाल्याने रस्त्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या कामामुळे अपघातांची शक्यता वाढली असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. गणेशोत्सव हा काहीच दिवसांवर येऊन ठेवला आहे. या काळात मुंबई व इतर शहरांतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी येतात. त्यापूर्वी जर या रस्त्यावरील खड्डे व्यवस्थित बुजवून रस्ता सुरळीत केला गेला नाही, तर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आणि चाकरमन्यांना एकत्र आणून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सरपंच मनोज चंदूरकर यांनी पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनाचीच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.