मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे ‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न; बँक व्यवस्थापकाची पोलिसांत तक्रार

रत्‍नागिरी : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार 25 ऑगस्ट रोजी पहाटे 3.43 वा.सुमारास उघडकीस आली.
याबाबत शाखा व्यवस्थापक शितल रमाकांत शिंदे (45,रत्‍नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, फिर्यादी या हातखंबा येथील बँकेच्या शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत. मंगळवारी पहाटे त्‍यांच्या बँकेतील सहकाऱ्याने त्‍यांना फोन करुन हातखंबा येथील एटीएम मशीन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडलेले असल्याची माहिती दिली. त्‍यामुळे फिर्यादी यांनी बँकेत जाउन खात्री केली असता त्‍यांना एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्‍न केल्याचे निदर्शनास आले.