लांजा हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे प्रतीक्षा विशेष शाळेत रक्षाबंधन, वीस वर्षांची मायेची परंपरा
संतोष कोत्रे
लांजा : बहीण आणि भाऊ यांच्या अतूट, निस्वार्थी प्रेमाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन होय. माणुसकीच्या नात्यांची वीण अधिक घट्ट करणारा स्नेहबंधाचा दिवस. याच भावनेतून न्यू इंग्लिश स्कूल व तु.पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा च्या विद्यार्थिनींनी विलवडे येथील प्रतिक्षा विशेष शाळेला भेट देऊन तेथील विशेष विद्यार्थ्यांना हाती प्रेमाने राख्या बांधत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्यांच्या या आपुलकीच्या, स्नेहपूर्ण बंधनामुळे येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची, प्रेमाची लकेर उमटली.
प्रशालेचे पर्यवेक्षक रवींद्र वासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तब्बल वीस वर्षे हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. शाळेच्या या आगळ्यावेगळ्या परंपरेतून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आपुलकी, समता, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव रुजविण्याचे कार्य केले जात आहे.
या अनोख्या रक्षाबंधन कार्यक्रमा प्रसंगी लांजा हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी विशेष शाळेतील मुलांना राख्या बांधून त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधला. यामुळे जणू एक कौटुंबिक सोहळाच अनुभवास मिळाला. राखीचा हा धागा केवळ मनगटावर नाही, तर माणुसकीच्या हृदयांनाही जोडणारा आहे,’ हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
गेली २० वर्षे अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा म्हणजे प्रशालेच्या सामाजिक बांधिलकीचे आणि संस्कारक्षम शिक्षणाचे जिवंत उदाहरण ठरले आहे. या अनोख्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांसह येथील शिक्षक वर्गदेखील भारावून गेले.













