सावंतवाडीकरांसाठी महत्त्वाची सूचना! दोन दिवस पाणीपुरवठा बंद; जून-जुलैची पाणी बिलेही उशिरा मिळणार

सावंतवाडी : प्रतिनिधी 

 

सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा आणि पाणी बिलाबाबत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. चीवार टेकडी येथील पाण्याची साठवण टाकी १ सप्टेंबर रोजी साफ करण्यात येणार असल्याने शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. त्याचबरोबर पाणी बिल तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने जून-जुलै महिन्यांची पाणी बिलेही नागरिकांना उशिरा मिळणार आहेत.

 

सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चीवार टेकडी येथील पाण्याची साठवण टाकी साफ करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे २ आणि ३ सप्टेंबर २०२६ रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरचे दोन दिवस म्हणजेच ४ आणि ५ सप्टेंबर रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता नगरपरिषदेने जाहीर सूचनेद्वारे कळवली आहे.

 

या पाणीपुरवठा बंदचा परिणाम सबनीसवाडा, बाहेरचावाडा, काजरेकर घरापासून काजरकॉडपर्यंत, सिक्वेरावाडा, लाडाचे बाग, सुवर्ण कॉलनी, बिरोडकर टेंब, कॉटेज हॉस्पिटल, आयुर्वेद हॉस्पिटल, खासकीलवाडा, म्हादळभाट, कामत लाईन, रसाळ पाणंद, तिलारी रोड, समाजमंदिर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, वजरवाडी, नाडकर्णी पाणंद तसेच चराठा ग्रामपंचायत या भागांवर होणार आहे.

 

दरम्यान, सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणी बिले तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यांची पाणी बिले नागरिकांना उशिरा वितरित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि बिल उशिरा मिळाल्यास गैरसमज करून घेऊ नये, असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने संबंधित भागातील नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, तसेच पाणी बिलासंदर्भातील विलंबाची नोंद घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेने केले आहे