युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लांजा आगरवाडीत पार पडली मार्गदर्शन कार्यशाळा

पोलीस, आर्मी भरतीसह व्यवसायाच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

संतोष कोत्रे
लांजा –: सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या वाडीतील, गावातील युवकांना विविध स्पर्धा परीक्षा, शासकीय नोकर भरती प्रक्रिये बाबत योग्य मार्गदर्शन मिळावे आणि युवकांनी किंवा त्याद्वारे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून आपले उज्वल भवितव्य घडवावे या उद्देशाने जि. प. शाळा लांजा नं. २, आगरवाडी येथे भरती व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच पार पडली
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गेली २५ वर्षे पुणे पोलीस दलात सेवा बजावत असलेले संजय आग्रे उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ पोलीस सेवेत आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. पोलीस भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, भरतीची प्रक्रिया, शारीरिक चाचणी, लेखी परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन, शारीरिक तंदुरुस्ती, आहार नियोजन,शिस्त आणि सातत्य याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “भरतीची तयारी जाहिरात आल्यानंतर सुरू न करता विद्यार्थी जीवनापासूनच शारीरिक व मानसिक तयारीला सुरुवात करावी,” असा महत्त्वपूर्ण संदेश पोलीस संजय आग्रे यांनी विद्यार्थ्यांना दिला. तर गेल्या दोन वर्षांपासून इंडियन एअर फोर्समध्ये सेवा बजावत असलेले आगरवाडीचे सुपुत्र साहिल सरफरे यांनी विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी, शिस्त, मेहनत, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरपणा आणि देशसेवेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. स्वतःच्या अनुभवातून त्यांनी विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्याची प्रेरणा दिली.
यासोबतच विद्यार्थ्यांनी केवळ सरकारी नोकरीच्या पर्यायावर अवलंबून न राहता कौशल्याधारित शिक्षण, स्वयंरोजगार आणि व्यवसायाच्या विविध संधींचाही विचार करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आगरवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रमोद आग्रे, माजी उपसरपंच तुकाराम आग्रे, ग्रामस्थ राजाराम करंबेळे, संजय बापेरकर, प्रशांत करंबेळे आणि स्वप्नील करंबेळे यांची आवर्जून उपस्थिती लाभली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रमोद आग्रे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित राहिलेल्या सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक, ग्रामस्थ व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.