आ. शेखर निकम, प्रशांत यादव आणि कविवर्य प्रमोद जोशी यांची उपस्थिती
चिपळूण (प्रतिनिधी) : विविध क्षेत्रात काम करणाऱ्या चिपळूण येथील काही तरुणांनी स्थापन केलेल्या सृजन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा रविवार दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी वीरेश्वर कॉलनी येथील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या बेडेकर सभागृहामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री आदिती सारंगधर यांच्या हस्ते शानदार शुभारंभ झाला. याप्रसंगी आ. शेखर निकम तसेच वाशिष्टी दूध प्रकल्पाचे प्रवर्तक प्रशांत यादव आणि देवगडचे सुप्रसिद्ध कविवर्य प्रमोद जोशी यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम सृजन संस्थेतर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि रसिक प्रेक्षकांचे शब्द सुमनाने आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर अभिनेत्री आदिती सारंगधर, आमदार माननीय शेखरजी निकम, प्रशांत यादव, कवीवर्य प्रमोद जोशी यांचे शुभहस्ते दीपप्रज्वलन करून आणि कोकण भूमीचे निर्माते भगवान परशुराम यांचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर लगेचच सृजन संस्थेच्या बोधचिन्हाचे अनावरण रिमोट बटन दाबून करण्यात आले व सृजन चॅरिटेबल ट्रस्ट चिपळूण या बहुउद्देशीय संस्थेचा आजपासून शुभारंभ झाला आहे असे प्रमुख अतिथींच्या वतीने जाहीर करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. मेघना गोखले यांनी संस्था स्थापन करण्यामागचे उद्देश आणि हेतू आपल्या प्रास्ताविकातून \विशद केले. यानंतर कविवर्य प्रमोद जोशी यांनी सृजन या संस्थेच्या स्थापनेची जाहिरात पाहून केलेल्या एका सुंदर कवितेचे सादरीकरण सौ स्नेहल जोशी यांनी केले. या कवितेतून प्रमोद जोशी यांनी सृजन संस्थेचे भविष्यातील काम कसे असेल याचे वर्णन केले.
यानंतर प्रमोद जोशी यांनी स्वतः त्यांच्या खास अशा काव्यमय शैलीतून आपले मनोगत व्यक्त करताना सृजन म्हणजे नवनिर्मिती असते. सृजनसंस्था आपल्या कार्याने आणि कर्तुत्वाने भविष्यात जगाच्या नकाशावर येईल असे सांगितले. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा मनोगत व्यक्त करण्याच्या शैलीमुळे उपस्थित सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. चिपळूणकर श्रोते जिंदादील आहेत यामुळे वारंवार त्यांच्याशी बोलावे असे वाटते असेही ते म्हणाले. संस्थेच्या वतीने त्यांचा तसेच आजच्या प्रमुख पाहुण्या आदिती सारंगधर, आ. शेखर निकम आणि प्रशांत यादव यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने सृजन संस्था बहुउद्देशी असल्यामुळे श्री निशिकांत तथा कांता कानिटकर नाट्य क्षेत्र, विश्वास तथा भाऊ काटदरे निसर्ग क्षेत्र आणि कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर संगीत क्षेत्र या मान्यवरांचाही त्यांच्या क्षेत्रातील यशस्वीतेबद्दल सन्मान करण्यात आला.
आ. शेखर निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण चमत्कार दाखविल्याशिवाय लोक आपल्याला नमस्कार करत नाहीत, यामुळेच सृजन संस्थेने आपल्या कामाचा ठसा समाजामध्ये उमटवावा म्हणजे समाज आपोआपच सृजन संस्थेच्या कामाकडे आकर्षित होतील. प्रशांत यादव यांनी कोकणामध्ये थोर कलावंत निर्माण झालेले आहेत, यामागे त्या कलावंतांनी घेतलेली मेहनत आणि जिद्द दिसून येते. सृजन संस्था ही अशाच मेहनती लोकांची असून भविष्यात सृजन संस्थेचा वटवृक्ष होईल. मुख्य अतिथी आदिती सारंगधर यांनी आपल्या मनोगतात बोलताना चिपळूण विषयी मला खूपच आत्मीयता निर्माण झाली आहे. कारण येथील रसिक श्रोते आणि प्रेक्षक कलाकारांना नेहमीच उचलून धरतात. यामुळे मी भारावून गेले आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी आल्यावर मला माझ्या लहानपणात गेल्यासारखे वाटले, असे सांगितले. उद्घाटन समारंभानंतर सर्व रसिकांना संस्थेतर्फे पेढे वाटून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.
याचवेळी चिपळूणमधील कलाकारानी सादर केलेला “ऋतुनाद” कार्यक्रम अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये सादर करण्यात आला. पुण्याचे निसर्ग अभ्यासक अनुज खरे यांना नागझिरा जंगल विविध ऋतूंमध्ये कसे वाटले याचे अनुभव ओंकार बापट यांनी शब्दबद्ध केले होते, त्याचे सादरीकरण ओंकार बापट आणि कलाकार अनिरुद्ध दडके यानी आपल्या भारदार आवाजामध्ये केले. या अनुभवांच्या जोडीला विविध ऋतूंची गाणी अनामय बापट, आशुतोष चितळे, आणि सौ. उत्तरा भागवत साडविलकर यांनी सादर केली. त्यांना अमेय भिडे यांनी तबला, सुधीर देवस्थळी यांनी हार्मोनियमची साथ दिली. बालकलाकार आरुष कुडाळकर याने टाळ वाजवून सुरेल साथ केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत नियोजन राहुल साडविलकर यांनी केले होते. तसेच त्यांनी की-बोर्डवरही या कार्यक्रमाची साथ केली. हा कार्यक्रम सुमारे दोन तास अतिशय संगीतमय अशा वातावरणात आणि आपण नागझिरा जंगलातच वावरतोय अशा भावनेत सादर केला गेला.
सृजन संस्थेच्या शुभारंभाच्या तसेच ऋतुनाद कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी कार्यक्रमाचे संयोजक असलेले मंगेश बापट, शशांक बापट, आनंद बापट, केतन मांजरेकर, मनोज भाटवडेकर, आदित्य जोशी, चिन्मय दीक्षित यांनी खूप मेहनत घेतली होती. सृजन हे संस्थेचे नाव संस्थेचे सल्लागार मंगेश बापट यांनी सुचविलेले आहे. भविष्यात सृजन चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे निसर्ग, सांगीतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, गड किल्ले ऐतिहासिक क्षेत्र अशा विविध स्वरूपाच्या क्षेत्रांमध्ये विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येतील याचा सर्व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आभार प्रदर्शन करताना मंगेश बापट यांनी केले. या संस्थेच्या स्थापनेसाठी चिपळूणमधील अनेक निसर्गप्रेमी, नाट्यप्रेमी, संस्कृती प्रेमी हितचिंतकानी खूप मदत केली. यासाठी संस्थेतर्फे सर्व देणगीदारांचे आणि हितचिंतकांचेही आभार मानण्यात आले.













