किशोर पाटकर यांच्या सौजन्याने कुडाळ हायस्कूलच्या १०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली
स्वप्निल कदम-कुडाळ :
शाळा विद्यार्थ्यांना शिक्षण देते; मात्र आई-वडिलांनी दिलेले संस्कार त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देतात. त्यामुळे शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले.
कुडाळ हायस्कूल व जुनिअर कॉलेज, कुडाळ येथे शिवसेनेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. ठाणे जिल्हाप्रमुख तथा नवी मुंबई नगरसेवक किशोर पाटकर आणि उपजिल्हाप्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने शाळेतील १०० गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी सुमारे १० हजार रुपये किमतीच्या सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सायकली सुपूर्द करताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संस्था उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, मुख्याध्यापक बिपिन वराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, श्री. वैद्य सर, विनायक राणे, माजी मुख्याध्यापक का. आ. सामंत, देवेंद्र नाईक, अभि गावडे, ॲड. राजीव कुडाळकर, विलास कुडाळकर, दत्तप्रसाद शेनई, सौ. प्रतिभा पाटणकर, अरविंद करलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना दत्ता सामंत यांनी शिक्षणासोबत संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. पालकांनी मुलांना दररोज संध्याकाळी रामरक्षा व अथर्वशीर्ष शिकवावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रामाणिक कमाई करून नियमित आयकर भरणे हीच व्यक्तीची खरी ओळख असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी हुशार आणि चांगल्या मुलांची संगत ठेवून जीवनात प्रगती करावी, असा संदेश त्यांनी दिला.
संस्था उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वह्या, पुस्तके किंवा छत्र्यांचे वाटप केले जाते; मात्र सुमारे १० हजार रुपये किमतीची सायकल विद्यार्थ्यांना मोफत देणे हा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी सायकल खरेदीसाठी बँकांकडून कर्ज घ्यावे लागत असे; मात्र आज विद्यार्थ्यांना थेट सायकली उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कार्यपद्धतीचे तसेच खासदार नारायण राणे यांच्या संस्कारांचे कौतुक केले.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, श्री. वैद्य सर तसेच पालक प्रतिनिधी विद्याधर चारी यांनी मनोगत व्यक्त केले.
पावसाची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ हायस्कूलच्या हॉलमध्ये करण्यात आला. त्यानंतर हायस्कूलच्या मोकळ्या मैदानात मान्यवरांच्या हस्ते १०० विद्यार्थ्यांना सायकली सुपूर्द करण्यात आल्या. सायकल मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.












