विरण विकास संस्थेची वार्षिक सभा संपन्न: १००% कर्जवसुलीसह संस्था ऊर्जितावस्थेत!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर विरण विकास संस्थेची वार्षिक सभा ग्रामपंचायत मसदे चुनवरेच्या सभागृहात माजी वित्त बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या विशेष उपस्थितीत व संस्था चेअरमन रामदास पांजरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या वेळी बोलताना माजी वित्त बांधकाम सभापती अनिल कांदळकर म्हणाले, सध्याच्या काळात सहकारी संस्था यशस्वीपणे चालवणे हे मोठे आव्हान असते. मात्र, विरण विकास संस्थेने १००% कर्जवसुली करून आणि पूर्वीचा तोटा भरून काढून पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त केली आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. संस्थेचे रेशन दुकान आणि इतर कारभार अतिशय पारदर्शक व समाधानकारक सुरू असून, अशाच प्रकारे संचालक मंडळ आणि सभासदांच्या एकजुटीतून ही संस्था अधिक प्रगती करेल असा मला विश्वास आहे. शंभर टक्के कर्ज वसुली बद्दल चेअरमन रामदास पांजरी यानी सर्वांचे आभार मानले.

या प्रसंगी उपाध्यक्ष पंकज परब, संचालक मोहन घाडीगांवकर, दत्ताराम आंबेरकर, विश्वनाथ परब, काशिराम परब, बबन परब, जयेश नार्वेकर, सहदेव झोरे, जागृती परब, सौ. परब तसेच माजी संचालक सुभाष धुरी, सुभाष परब, मसदेकर गुरुजी, संस्था सचिव श्रीमती सावंत, माजी सचिव मोहन गावडे, विजय घाडीगांवकर, कर्मचारी वर्ग आणि संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संचालक मोहन घाडीगांवकर यांनी प्रास्ताविक केले. सभेत संस्थेच्या वार्षिक आर्थिक अहवालाचे वाचन करण्यात आले. संस्थेची कर्जवसुली १००% झाली असून पुर्वीचा तोटा भरून काढून आता संस्था ऊर्जितावस्थेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच रेशन दुकानाचे कामकाजही समाधानकारक असल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

सभेत माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा अनिल कांदळकर, चेअरमन रामदास पांजरी व पंकज परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच श्री गणेश चतुर्थीचे औचित्य साधून सर्व सभासद शेतकऱ्यांना शुभेच्छा म्हणून प्रत्येकी २ किलो गूळ भेट स्वरूपात देण्यात आला.