वडिलांच्या खात्यातून २ लाख ४९ हजार रुपये काढल्याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा

आजारी असताना विश्वासाने दिलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप

 कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कणकवली : आजारी असताना विश्वासाने मुलाकडे ठेवण्यासाठी दिलेल्या एटीएम कार्डचा वापर करून वडिलांच्या बँक खात्यातून त्यांच्या परवानगीशिवाय २ लाख ४९ हजार रुपये काढल्याप्रकरणी मुलाविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलमठ-गाडेवाडी येथील ८० वर्षीय विजय रघुनाथ चिंदरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा रविंद्र विजय चिंदरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विजय चिंदरकर हे कलमठ-गाडेवाडी येथे एकटे राहतात. त्यांना दोन मुलगे व दोन मुली असून, दोन्ही मुली विवाहित आहेत. त्यांचा मोठा मुलगा रविंद्र हा बदलापूर येथे आपल्या कुटुंबासह राहतो, तर दुसरा मुलगा सुरेंद्र हा कामानिमित्त कल्याण येथे वास्तव्यास आहे.

 

चिंदरकर यांच्या कणकवली येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये बचत होती. त्यांचा मुलगा रविंद्र याने काही कामासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी चिंदरकर यांनी एक लाख रुपये धनादेशाद्वारे तसेच २५ हजार रुपये अशा एकूण १ लाख २५ हजार रुपयांची रक्कम त्याला दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आर्थिक व्यवहारावरून वडील व मुलामध्ये वाद असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

 

मागील वर्षी अचानक आजारी पडल्यानंतर विजय चिंदरकर यांनी विश्वास ठेवून आपले एटीएम कार्ड मुलगा रविंद्र याच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते. त्यावेळी एटीएमचा पिन क्रमांकही त्यांनी मुलाला सांगितला होता.

 

मात्र, २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत रविंद्र याने वडिलांना कोणतीही माहिती न देता किंवा त्यांची संमती न घेता एटीएमचा वापर केल्याचा आरोप आहे. कणकवली तसेच बदलापूर येथून विविध वेळी एटीएमद्वारे एकूण २ लाख ४९ हजार रुपये काढण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

आपल्या परवानगीशिवाय व विश्वासात न घेता सदर रक्कम काढून घेतल्याचा आरोप विजय चिंदरकर यांनी केला आहे. या फिर्यादीवरून कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (२) अन्वये रविंद्र विजय चिंदरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.