सार्वजनिक गणपती मंडळे व रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांशीही केली चर्चा
राजापूर प्रतिनिधी : गणेशोत्सव काळात गाव पातळीवरही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, चोरीच्या घटना घडणार नाहीत, वाद निर्माण होणार नाहीत याबाबत स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटलांनी अधिक सतर्क रहावे असे आवाहन राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.
गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी यादव यांनी राजापूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटलांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत यादव यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सव काळात गावात कोणताही वाद वा बाचाबाची होणार नाही, वैयक्तीक वाद उफाळून येणार नाहीत, जमिन जुमला वा अन्य विषयांवरून कोणताही तंटा होणार नाही याबाबत पोलीस पाटलांनी लक्ष द्यावे असे आवाहन यादव यांनी केले आहे.
सार्वजनिक गणपती मंडळे व रिक्षा संघटनांचीही बैठक
गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर यादव यांनी शहर व परिसरातील सार्वजनिन गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व रिक्षा संघटना पदाधिकारी यांचही बैठक घेतली. गणेशोत्सव मंडळांनी घ्यावयच्या खबरदारीबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. तर रिक्षा संघटना पदाधिकारी यांनी प्रवाशांकडून योग्य भाडे आकारणी करून योग्य प्रकारे सेवा देण्याच्या तसेच नियमांचे पालन करण्याच्या सुचना यादव यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील यांसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.













