चिपळूण (प्रतिनिधी) : साहित्य आणि शिक्षणाच्या संवर्धनाच्या क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल प्राचार्य अनिल सिंह यांना ८ सप्टेंबर २०२६ रोजी गोवा येथील लोकभवनात आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार ‘फेलिसिटेट अवॉर्ड्स’ समारंभात राष्ट्र गौरव सम्मानानी गोव्याचे महामहिम राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हिंदी काश्मीरी संगम यांच्या वतीने हा राष्ट्र गौरव सन्मान प्रदान करण्यात आला. प्राचार्य अनिल सिंह हे सध्या मुंबई विद्यापीठाच्या मानविकी विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता तसेच आदर्श विकास मंडळाच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, ठाणे (पश्चिम) येथील प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर येथे हिंदी विभागप्रमुख, प्रभारी प्राचार्य तसेच हिंदी संशोधन केंद्राचे समन्वयक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली आहे. हिंदी साहित्य आणि संशोधन क्षेत्रातील प्राचार्य अनिल सिंह यांचे योगदान समृद्ध व बहुआयामी आहे. ते मुंबई विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १६ संशोधकांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली असून, ५ संशोधक सध्या संशोधनकार्य करीत आहेत. त्यांचे १०५ हून अधिक संशोधनपर लेख व समीक्षणे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाली आहेत. त्यांनी ४ पुस्तकांचे स्वतंत्र लेखन केले असून २४ पुस्तकांचे संपादन केले आहे. शैक्षणिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातही प्राचार्य अनिल सिंह यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत.
विविध विद्यापीठांच्या संशोधन मान्यता समित्या तसेच हिंदी अभ्यास मंडळांशी ते संबंधित राहिले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने गठित केलेल्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्राचार्य अनिल सिंह यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक कार्याचा विस्तार राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. त्यांनी ९० हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय परिसंवाद व संमेलनांमध्ये विषयतज्ज्ञ तसेच अध्यक्ष म्हणून सहभाग नोंदविला आहे. हिंदी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना वेळोवेळी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘हिंदी सेवी विद्वान सन्मान’ हिंदी साहित्य अकादमी, मॉरिशस; महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र साहित्य अकादमीचा ‘मामावरेरकर’ सन्मान; तसेच ‘साहित्य सृजन सन्मान’ बाली, इंडोनेशिया यांचा विशेष उल्लेख करता येईल. प्राचार्य अनिल सिंह यांनी शिक्षणाच्या प्रचार-प्रसाराच्या निमित्ताने मॉरिशस, उझबेकिस्तान, ताश्कंद, मॉस्को, पॅरिस, स्वित्झर्लंड, जर्मनी यांसह अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. या गौरवास्पद प्रसंगी हिंदी काश्मीरी संगमच्या संस्थापक-अध्यक्षा व संयोजक प्रो. बीना बुदकी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्राचार्य अनिल सिंह यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.












