खासदार नारायण राणे, आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला यश
संतोष कोत्रे
लांजा -: गणेशोत्सवाला दोन ते तीन दिवसांचा अवधी असतानाच लांजा शहरातील उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे .उड्डाणपुलाच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्याने चाकरमानी तसेच प्रवासी वर्गाची मोठी सोय झाली आहे खासदार नारायण राणे तसेच आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे.
लांजा शहरातून जाणारा मुंबई गोवा महामार्ग आणि येथील उड्डाण पुलाचे काम गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या स्थितीत होते. त्यामुळे त्याचा त्रास हा लांजावासीयांना भोगावा लागत होता. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम कधी होणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला होता. गणेशोत्सव तोंडावर आले असल्याने आणि उड्डाणपुराचे काम वेगाने सुरू असल्याने तो लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी
उड्डाणपुलावरून मुंबई ते गोवा या दिशेने जाणारी एकेरी वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली होती. पुढील काही दिवसात हा उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते.
लांजा येथील उड्डाणपुलाची एक लेन ही वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. मात्र गणेशोत्सवापूर्वी हा उड्डाणपूल सुरू करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्न सुरू केले होते. अखेर आमदार किरण सामान यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे लांजा शहरातून जाणारा उड्डाणपूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आला असून दोन्ही लेन सुरू झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि खास करून गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची मोठी सोय झाली आहे.
याबरोबरच उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने लांजा शहरात गणेशोत्सवात होणारी वाहतूक कोंडी ची समस्या देखील कायमची दूर होणार आहे
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनधारक त्रस्त होते. उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने ही वर्षानुवर्षांची कोंडी कायमची फुटली आहे. विशेषतः गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून कोकणात येणाऱ्या लाखों चाकरमान्यांचा प्रवास यामुळे अत्यंत वेगात आणि खड्डेमुक्त, सुखकर होणार आहे.
आमदार किरण सामंत यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून यामुळे प्रवाशांमधून आणि स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे













