देवरूख महाविद्यालयात राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त प्रतिमा अभिवादन

देवरूख (प्रतिनिधी):

स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानाची छाप उमटविणारे आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालय, देवरुख येथे राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर विभागाच्यावतीने प्रतिमा अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या शौर्याला, राष्ट्रभक्तीला आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्वाला अभिवादन केले.

कार्यक्रमास एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, लेफ्टनंट प्रा. सानिका भालेकर, प्रा. विकास शृंगारे, प्रा. चेन्नया हिरेमठ आणि प्रा. देवयानी जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या धाडसी कार्याचे व मातृभूमीप्रती असलेल्या निष्ठेचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. राजे उमाजी नाईक यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.