खेड (प्रतिनिधी) : खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एल.टी.टी. इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेडच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. क्रीडा व युवक संचालनालय, पुणे, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी तसेच खेड तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय आणि खेड तालुका क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर रोजी मुकादम हायस्कूल, खेड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. बुद्धिबळाच्या पटावर प्रतिस्पर्ध्यांच्या प्रत्येक चालीचा अचूक अंदाज घेत, प्रसंगावधान, चपळता आणि प्रभावी डावपेचांचा वापर करत एल.टी.टी. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात कु. दक्ष कमलेश चव्हाण, तर मुलींच्या गटात कु. मीरा दीपक गुडेकर, कु. झारा इरफान रुमाने आणि कु. स्वरा सुनील शेठ यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कु. श्रेय उत्तम पाटणे, तर मुलींच्या गटात कु. अनुष्का नरेश पेडामकर आणि कु. अस्मिता वसंत भुसारे यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या गटात कु. अलीना अब्दुल मन्नान मुल्लाजी हिने आपल्या बुद्धिमत्तेची आणि खेळातील डावपेचांची प्रभावी छाप उमटवली.
या विद्यार्थ्यांनी स्पर्धेदरम्यान दाखवलेल्या आत्मविश्वासपूर्ण खेळाचे उपस्थित क्रीडाप्रेमींनी कौतुक केले. बुद्धिबळासारख्या बौद्धिक आणि संयमाची कसोटी पाहणाऱ्या खेळात विद्यार्थ्यांनी केलेली ही कामगिरी शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, प्रेमळ चिखले, जयेश गुहागरकर, चंद्रकिरण वैद्य, माजिद खतीब, डॉ. पुष्कर नेने, विलीन पाटणे, समन्वयक सेबास्टियन जॉय सर, समन्वयिका एल्सी मॅडम, मुख्याध्यापक जी. बी. सारंग सर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पी. एस. कुडाळकर मॅडम, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, पालक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडू आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडाशिक्षक अमर जड्याळ सर आणि सुशांत पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सातत्याने सराव करत बुद्धिबळातील कौशल्य विकसित केले आणि तालुकास्तरीय स्पर्धेत त्याचे प्रभावी प्रदर्शन केले.
एल.टी.टी. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून, त्यांच्या यशाचे खेड तालुक्यातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे. भविष्यातही या विद्यार्थ्यांनी जिल्हा तसेच राज्यस्तरावर उत्तुंग कामगिरी करावी, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.












