प्रलंबित महसूल दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान

मंडणगड : प्रलंबित महसूल दावे तडजोडीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. मंडणगड तहसील कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित महसूल दावे या अभियानांतर्गत तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन तहसीलदार मंडणगड यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत तालुक्यातील ज्या शेतकरी अथवा नागरिकांची प्रकरणे तहसीलदार कार्यालय, चिपळूण किंवा मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहेत आणि ज्या प्रकरणांमध्ये परस्पर तडजोडीने व सहमतीने निकाल काढणे शक्य आहे, अशा प्रकरणांसाठी संबंधित पक्षकारांनी २० सप्टेंबर २०२६ पासून कार्यालयीन वेळेत ‘लोक अदालत संमती अर्ज’ दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दोन्ही पक्षकारांनी परस्पर संमती दिल्यास संबंधित प्रकरण लोकअदालतीत घेऊन निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे प्रलंबित महसूल प्रकरणांचा जलद व तडजोडीने निपटारा होण्यास नागरिकांना मदत होणार आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी तहसील कार्यालय मंडणगड, सर्व मंडळ अधिकारी कार्यालये तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भातील ‘महसूल लोकअदालत तडजोडीनामा अर्ज नमुना’ उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यामध्ये पक्षकारांची माहिती, महसूल दावा क्रमांक व वर्ष, पक्षकारांचे वकिलांचे तपशील, महसूल दाव्याचे थोडक्यात स्वरूप आणि दावा लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यासाठी सहमती आदी माहिती नमूद करावयाची आहे. महसुल विभागाचे लोक अदालत उपक्रमाचा तालुक्यातील नागरीकांना लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी केले आहे.