विभागीय स्पर्धेसाठी निवड; दर्शन कदम व श्रीपाद धुरी यांचीही उल्लेखनीय कामगिरी
चिपळूण (प्रतिनिधी) : राजापूर येथे दि. १० सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.
या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटांमध्ये विविध २० ते १०० किलो वजन गटांत जिल्ह्यातील सुमारे ७०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विद्यालयाच्या वतीने इयत्ता नववीतील गंधर्व धने, इयत्ता सहावीतील श्रीपाद धुरी आणि दर्शन कदम या तीन खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये गंधर्व धने याने १७ वर्षे वयोगटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गंधर्वच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तसेच दर्शन कदम व श्रीपाद धुरी यांनीही आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक प्राप्त करून विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली. या सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे व प्रशांत सकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आ. शेखर निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, शालेय समितीचे चेअरमन व विश्वस्त शांताराम खानोलकर तसेच सर्व संचालक मंडळाने खेळाडूंचे कौतुक करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. गंधर्व धनेच्या विभागीय स्पर्धेतील कामगिरीकडे आता संपूर्ण विद्यालयाचे लक्ष लागले असून, त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.











