गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या, शृंगारतळी बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी वर्दळ

गुहागर | प्रतिनिधी :
कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो.अवघ्या एका दिवसावर आलेल्या आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी चाकरमानी गावी दाखल झाले असून गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे.
गुहागर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून शृंगारतळी बाजारपेठ ओळखली जाते.या मध्यवर्ती ठिकाणी आजुबाजूच्या परिसरातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.सध्या येथील बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत असून विविध प्रकारचे आकर्षक मखर, गणरायाच्या डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य,पूजा साहित्य तसेच फळविक्रेते आदी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे.एकूणच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने तालुक्यात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.